आयटी कर्मचाऱ्यांचा मोठा पगार हा सर्वांच्याच चर्चेचा विषय असतो. कित्येक जण तर केवळ मोठं पॅकेज मिळेल म्हणून या क्षेत्रात जातात. मात्र, या मोठ्या पगारासोबतच येणाऱ्या डेडलाईन, ताण-तणाव याकडे कोणीही लक्ष देत नाही. एका ऑनलाईन सर्वेक्षणात असं समोर आलं आहे, की मोठ्या पगारापेक्षा आयटी कर्मचारी आयुष्यातील आनंदाला आता जास्त महत्त्व देत आहेत.
टेक करिअर कम्युनिटी असणाऱ्या 'ब्लाईंड' या वेबसाईटवर कित्येक लोक अनामिकपणे आपली मतं मांडत असतात. याठिकाणी मेटामधील एका कर्मचाऱ्याने असं म्हटलं आहे, की "मोठ्या पगाराऐवजी मी कमी पगारात आनंदी असण्याला प्राधान्य देईल." आणखी एका मेटा कर्मचाऱ्याने म्हटलंय, की "बहुतांश हाय टीसी (टोटल कॉम्पेन्सेशन) कंपन्या या लेऑफच्या विचारात आहेत. स्किप फायर हेच त्यांचं कल्चर आहे."
कमी पगार चालेल, मात्र ही टॉक्सिसिटी नको; असं सेल्सफोर्स कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने म्हटलंय. ब्लाईंड वेबसाईटने काही दिवसांपूर्वी यासंदर्भात एक सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये असं दिसून आलं, की नोकरी शोधताना कर्मचारी मोठ्या पगाराव्यतिरिक्त इतर गोष्टींचा देखील विचार करत आहेत.
या गोष्टी ठरतायत महत्त्वाच्या
सध्या मोठ्या कंपन्या लेऑफ करत आहेत. त्यामुळे नोकरी मिळणं अवघड झालं आहे. मात्र, तरीही उमेदवार कंपनीतील बिझनेस कल्चर, वर्क-लाईफ बॅलन्स, स्थिरता अशा गोष्टींना अधिक महत्व देत आहेत. ब्लाईंडच्या सर्वेक्षणात ५६ टक्के आयटी (IT Employees) कर्मचाऱ्यांनी असं म्हटलं; की त्यांच्या इतर मागण्या पूर्ण होत असतील तर ते आहे त्या, किंवा कमी पगारावर देखील दुसऱ्या कंपनीत काम करण्यास तयार आहेत.
कमी पगारात काम करण्याच्या तयारीमागे लेऑफ हेदेखील एक कारण आहे. मात्र, सोबतच कित्येक लोक केवळ वर्क-फ्रॉम होम मिळावं यासाठी देखील कमी पगार घेण्यासाठी तयार असल्याचं समोर आलं आहे.
कर्मचाऱ्यांच्या या मानसिकतेमुळे कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण यामुळे कमी पगारात चांगले काम करणारे कर्मचारी मिळण्याची शक्यता वाढत आहे. अर्थात, कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांकडे लक्ष देणं गरजेचं ठरणार आहे.