चांद्रयान-३ मोहीम यशस्वी व्हावी यासाठी विविध धर्मीयांकडून प्रार्थना केली जात होती. हिंदू बांधवांकडून भव्य यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले जात होते. तर मस्जिदिंमध्ये मुस्लीम बांधवांकडून नमाजनंतर दुवा करण्यात येत होत्या. आणि अखेर तो सुवर्णक्षण उगवला. २३ ऑगष्ट रोजी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान-३ चं लँडर आणि रोव्हर चंद्रावर लँड झालं आणि अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीननंतर चंद्रावर यशस्वीरीत्या लँड करणारा भारत चौथा देश बनला. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा पहिला देश बनला.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुखरूपपणे उतरत विक्रम लॅंडरने इतिहास घडविला आणि संपूर्ण देशभरात जल्लोष सुरु झाला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील खतौली या महामार्गावरील शहराच्या रहिवाशांनी तर जणू ईद असल्यासारखा आनंदोत्सव साजरा केला. मुस्लीम बांधवांनी एकमेकांना मिठाई भरविली. तर, संपूर्ण परिसर ‘भारत माता कि जय’च्या घोषणांनी दुमदुमला.
या जल्लोषाला कारणही तितकेच मोठे होते. भारताला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचवणारा पहिला देश बनवणाऱ्या इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या टीममधील एक शास्त्रज्ञ याच शहरातील आहे. त्याचे नाव अरीब अहमद.
अरीबने शास्त्रज्ञ होण्यासाठी आणि चांद्रयान-३ मोहिमेत इस्रोच्या टीममध्ये सामील होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करताच खतौलीतील काही रहिवाशांनी अरीबच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आणि त्याच्या यशाबद्दल पालकांचे अभिनंदन करण्यासाठी अरीबच्या घराकडे धाव घेतली.
इस्रोमध्ये निवड झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत अरीब म्हणाला होता कि, “इस्त्रोमध्ये निवड व्हावी यासाठी मी खूप प्रयत्न केले. वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन केले. सलग १२-१२ तास मी अभ्यास करत होतो. परीक्षेपूर्वी प्रश्नावली सोडवत असतांना मी सुरुवातीला ५० प्रश्न सोडवत होतो. पण, अभ्यासाच्या सातत्याने माझा स्टॅमीना वाढला आणि पुढे मी १५० प्रश्न सोडवू लागलो. आणि अखेर माझ्या प्रयत्नांना यश आले.”
‘अरीबला नेहमीच देशासाठी काहीतरी करायचे होते. लहानपणापासूनच सर्जनशील असलेल्या अरीबला बालपणी खेळण्यांमध्येही रॉकेट बनवायला आवडत असे. त्याच्या या छंदाचे सगळ्यांनाच अप्रूप वाटायचे,’ अशा आठवणी आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी सांगितल्या.
तर, अरीबचे मामा एम. असद फारोकी म्हणाले, “चांद्रयान ३ लाँच होण्यापूर्वी आरीबच्या मनात धाकधूक होती. कारण या प्रोजेक्टच्या तयारीत त्याने स्वतःला इतके गुंतवले होते कि त्याने केस कापायला जाण्याचीही तसदी घेतली नहोती. हा प्रोजेक्ट यशस्वी व्हावा म्हणून आपण सगळेच प्रार्थना करत होतो.”
त्याचे कुटुंबीय सांगतात की, “अरीब दहावीत टॉपर होता तर, बारावीच्या परीक्षेत त्याने ९५ टक्के गुण मिळवले होते. त्याने जामिया मिलिया इस्लामियामधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली होती. नंतर उच्च शिक्षणासाठी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला. त्याची पहिली नोकरी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये होती.
दरम्यान, तो इस्रोच्या सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्ड २०१९ च्या शास्त्रज्ञ पदासाठीच्या परीक्षेला बसला आणि त्यातही त्याने टॉप केले.” अरीबच्या कुटुंबियांची इच्छा होती कि त्याने नागरी सेवेमध्ये जावे. मात्र, अरीबची आवड रॉकेट सायन्समध्ये होती त्यामुळे त्याने अवकाश संशोधनाची निवड केली.
आपल्या मुलाच्या कर्तुत्वाने भारावून गेलेले अरीबचे वडील काझी मेहताब झिया म्हणतात, “मुलांच्या अभ्यासात कोणत्याही प्रकारचा अडथला येणार नाही, याकडे मी नेहमीच लक्ष दिले. मी त्यांना सांगायचो कि, गर्दीचा भाग न होता तुम्ही काहीतरी वेगळ करून दाखवा. अस करा ज्याने सर्वसामान्य माणसाला फायदा होईल. मानवतावादी बना.
सामान्यतः मुले त्यांच्या पालकांच्या कर्तृत्वाने ओळखली जातात. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो कि माझ्या मुलाच्या कर्तृत्वामुळे मी ओळखला जात आहे. अरीब काहीतरी मोठे करेल ज्याने एक दिवस कुटुंबियांना त्याच्यावर गर्व होईल, असे मला नेहमीच वाटायचे. परंतु, या यशस्वी मिशनमुळे व त्याने दिलेल्या योगदानामुळे आता संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे. परिसरात, प्रत्येकजण माझे अभिनंदन करत आहे, जे मला ओळखत नव्हते ते देखील अरिबचे वडील म्हणून ओळखत आहेत. यापेक्षा एका बापाला काय हवं."
तर, मुलाच्या यशाने भावनिक झालेली अरीबची आई नाजनीन म्हणाली, “जेव्हा मी त्याची धडपड पाहायचे, त्याला दिवसभर अभ्यास करताना पाहायचे तेव्हा मला त्याच्या तब्येतीची काळजी वाटायची. परंतु, आज मी खूप खुश आहे की त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले.”
देशाची मान गर्वाने उंचावणाऱ्या संपूर्ण इस्त्रो टीमचे आणि अरीबचे ‘आवाज’कडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!