झुकेरबर्गचा भारताविषयीचा दावा खोटा - केंद्रीय मंत्री वैष्णव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 21 h ago
 झुकरबर्ग आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
झुकरबर्ग आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

 

मेटा प्लॅटफॉर्म्स आयएनसीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी 'जो रोगन' पॉडकास्टमध्ये भारताबद्दल केलेल्या शेरेबाजीमुळे वाद उफाळला आहे. कोरोना महासाथ हाताळण्यात आपापल्या सरकारांना अपयश आल्याबद्दल जगभरातील नागरिकांमध्ये असलेल्या असंतोषावर चर्चा करताना त्यांनी भारताचेही उदाहरण दिले. या महासाथीचा परिणाम म्हणून, भारतासह बहुतेक सत्ताधारी सरकार नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाली, असेही पुढे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झुकरबर्ग यांच्या वक्तव्यातील चूक निदर्शनास आणून दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले, "जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ६४० दशलक्षाहून अधिक मतदारांनी 'एनडीए' आघाडीला विक्रमी मतदान केले. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला."

मोदी सरकारच्या योजनांमुळे जनतेने पुन्हा एकदा एनडीए सरकारवर विश्वास व्यक्त केल्याचे वैष्णव यांनी म्हटले आहे. देशातील ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, लशीच्या २.२ अब्ज मोफत मात्रा, ११० दशलक्ष हून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत, भारताने गरजू राष्ट्रांना पुरवलेली मदत, धोरणात्मक गुंतवणुकीमुळे महासाथीनंतरही एनडीए सरकारला जनतेने कौल दिला, असे वैष्णव म्हणाले.

काय म्हटले होते झुकेरबर्ग ?
■ जो रोगन पॉडकास्टमध्ये मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटल्यानुसार, "मला वाटते की, कोरोना हाताळणीतील अपयशामुळे कदाचित जगभरातील बऱ्याच सरकारांवरील विश्वास उडाला आहे. २०२४ हे जगभरातील निवडणुकीचे मोठे वर्ष होते आणि भारतासारखे अनेक देश आणि इतर अनेक देशांमधील निवडणुकांमध्ये प्रत्येक सत्ताधारी पक्ष पराभूत झाला."