विश्वविख्यात तबलानवाज उस्ताद झाकिर हुसेन यांच्या पार्थिवावर आज सॅन फ्रान्सिस्को येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसिद्ध ड्रमवादक शिवमणी आणि इतर काही कलाकारांनी इमवादन करीत या लोकप्रिय कलाकाराला श्रद्धांजली वाहिली.
फुप्फुसाच्या विकारामुळे उस्ताद झाकीर हुसेन यांचे सोमवारी (ता. १६) अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे निधन झाले होते. तबला या तालवाद्याला भारतात आणि जगभरातही प्रसिद्ध करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. नम्र स्वभाव, हसरा चेहरा, चैतन्यपूर्ण वावर आणि तबला वादनावर कमालीची हुकूमत यामुळे उस्ताद झाकीर हुसेन हे संगीत रसिकांमध्ये अत्यंत प्रिय होते. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वाला धक्का बसला होता. आज अमेरिकेतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो चाहते सॅनफ्रान्सिस्को येथील फर्नवूड स्मशानभूमीत जमले होते. यावेळी शिवमणी व इतर कलाकारांनी ड्रमवादन करत झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली. हुसेन यांच्यामागे त्यांची पत्नी अँटोनिया मिनिकोला आणि अनिसा व इसाबेला अशा दोन मुली आहेत.
झाकीर हुसेन हे महान तबलावादक उस्ताद अल्लारखा यांचे ज्येष्ठ पुत्र होते. तबलावादनामध्ये प्रावीण्य मिळवितानाच झाकीर हुसेन यांनी शास्त्रीय संगीताच्या चौकटीबाहेरही तबल्याला नेत जॅझ आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतामध्येही त्याचा वापर करत या वाद्याला नवी उंची गाठून दिली. भारतात अनेक मानसन्मान मिळविणाऱ्या या महान कलाकाराचा पाश्चिमात्य संगीतविश्वानेही चार ग्रॅमी पुरस्कार देऊन गौरव केला होता.
यावेळी प्रसिद्ध ड्रमवादक शिवमणी यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, "ताल हा ईश्वर आहे आणि ते तुम्ही आहात झाकिरभाई. १९८२ पासून तुमच्याबरोबरील प्रवासात मी खूप काही शिकलो आहे. आमच्या प्रत्येक तालात तुम्ही उपस्थित असाल. तुम्ही जिथे गेला आहात. तिथे असलेल्या सर्व गुरूंना माझा नमस्कार सांगा."
'ग्रॅमी' विजेते संगीतकार रिकी केज हे देखील उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, "झाकिर हुसेन हे भारतात जन्मलेल्या महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक कलाकारांचे करिअर घडविले. आपल्या कृतीतून ते इतरांनाही प्रेरणा देत असत. पुढील अनेक पिढ्यांवर त्यांचा प्रभाव कायम राहील."