यूएई दौऱ्यावर असताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि यूएईचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री हमदान मोहम्मद यांची भेट
भारत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्यातील रणनीतिक भागीदारी आता अधिक मजबूत होणार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी दुबईचे युवराज आणि यूएईचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री हमदान बिन मोहम्मद यांची भेट घेतली. यावेळी जयशंकर यांनी भारत-यूएई रणनीतिक भागीदारीला एक नवीन वळण देण्यासाठी विविध मार्गांवर चर्चा केली.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे तीन दिवसीय यूएई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी दोन्ही देशांमधील व्यापक रणनीतिक आणि भागीदारीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. या संदर्भात त्यांनी ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. ते म्हणतात, “दुबईचे युवराज आणि यूएईचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री हमदान मोहम्मद यांना भेटून खूप आनंद झाला. यावेळी दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्यावर आणि ते लोकांच्या कल्याणासाठी वाढवण्यावर एक सकारात्मक चर्चा झाली.”
याभेटीविषयी बोलताना यूएईच्या युवराज म्हणतात, “भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत यूएई-भारत रणनीतिक भागीदारीला मजबूत करण्यासाठी आम्ही चर्चा केली. तसेच दोन्ही देशांतील लोकांमधील संबंध वाढविण्यावर चर्चा झाली.”
भारत-यूएई द्विपक्षीय संबंध गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहेत. ऑगस्ट २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UAE ला भेट दिली होती. यांनातर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत वाढ झाली.
२०२२मध्ये दोन्ही बाजूंनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचा मोठा विस्तार झाला आहे.
पंतप्रधान मोदींचे युवराज यांना भारत भेटीचे निमंत्रण
यूएई दौऱ्यावर असताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युवराज यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावतीने एप्रिलमध्ये भारत येण्याचे आमंत्रण दिले. या संदर्भात युवराजने ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले, ‘‘मला भारताच्या पंतप्रधानांकडून एप्रिलमध्ये देशाच्या भेटीचे आमंत्रण मिळाल्याचा आनंद झाला. आमच्या देशांमधील स्थिर संबंधांनी यूएई-भारत संबंधांना नवीन उंचीवर नेले आहे. आमची भागीदारी द्विपक्षीय सहयोगाचा आदर्श मॉडेल ठरली आहे आणि ती क्षेत्रीय तसेच जागतिक स्थिरतेत योगदान देत आहे.’’