व्हाइट हाऊसमध्ये इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प बोलताना
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीबाबत मोठे वक्तव्य करत जगभरात चर्चेला तोंड फोडले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, "अमेरिका गाझा पट्टी ताब्यात घेणार असून, तेथील संपूर्ण पुनर्बांधणी अमेरिकेच्या देखरेखीखाली केली जाईल."
गाझामध्ये अमेरिका करणार आर्थिक विकास?
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका गाझा पट्टीतील अवशेष हटवून "आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रकल्प आणि नोकऱ्यांची संधी निर्माण करेल." मात्र, गाझामधील मूळ रहिवाशांना परत जाऊ द्यावे की नाही, यावर त्यांनी संशय व्यक्त केला. "गाझातील नागरिकांनी इतर देशांमध्ये स्थलांतर करावे," असा सुचक इशारा त्यांनी दिला.
नेतान्याहूंचा पाठिंबा, अरब देशांचा विरोध
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना "इस्रायलचा सर्वात मोठा मित्र" संबोधत त्यांच्या योजनेला पाठिंबा दिला. मात्र, इजिप्त आणि जॉर्डन या अरब देशांनी गाझातील निर्वासितांना स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. "आम्ही गाझातील लोकांना आमच्या भूमीवर घेणार नाही," असे इजिप्त व जॉर्डनने ठणकावून सांगितले आहे.
हल्ल्यांनंतर शांततेसाठी हालचाली
हामासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात १,२१० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला, तर इस्रायली हल्ल्यात गाझामध्ये ४७,५१८ लोक मारले गेले, अशी माहिती हामासच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. सध्या युद्धविराम लागू असून, दोन्ही बाजूंनी कैद्यांची अदलाबदल सुरू आहे.
गाझा प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय भूमिका
ट्रम्प यांच्या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त केला जात आहे. "गाझावर कब्जा मिळवण्याचा अमेरिकेचा हेतू चुकीचा आहे. आम्ही आमचा देश गमावणार नाही," अशी प्रतिक्रिया गाझातील अनेक नागरिकांनी दिली आहे.