मध्यपूर्वेतील संघर्षामुळे व्यापक अस्वस्थता - एस. जयशंकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 14 h ago
कझानमधील ब्रिक्स आऊटरीच सत्रात बोलताना जयशंकर
कझानमधील ब्रिक्स आऊटरीच सत्रात बोलताना जयशंकर

 

१६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या प्लॅनेटरी सत्रामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी BRICS सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मध्य पूर्व आणि पश्चिम आशियातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.'हा संघर्ष आणखी वाढेल का या भीतीतून 'व्यापक असुरक्षितता' निर्माण झाली आहे.', असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.

कझानमधील ब्रिक्स आऊटरीच सत्रात बोलताना जयशंकर म्हणाले, "मध्य पूर्व आणि पश्चिम आशियातील परिस्थितीविषयीची आमची चिंता समजण्याजोगी आहे. या प्रदेशात संघर्ष वाढेल की काय याची सर्वांना भीती आहे. सागरी व्यापारावरही याचा मोठा परिणाम झाला आहे.  वाढलेल्या संघर्षाचे मानवी आणि भौतिकदृष्ट्या गंभीर परिणाम होऊ शकतात. कोणत्याही दृष्टिकोनातून समाधान हे न्यायसंगत आणि टिकाऊ असले पाहिजे, ज्यामुळे दोन राष्ट्रांची तोडगा निघेल." 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेल्या जयशंकर यांनी जोर दिला की संघर्ष आणि तणाव प्रभावीपणे हाताळले पाहिजेत. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की हा युद्धाचा काळ नाही. वाद आणि मतभेद संवाद आणि मुत्सद्दीपणाने सोडवले पाहिजेत. एकदा करार झाले की ते काटेकोरपणे पाळले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय कायदा पाळला गेला पाहिजे. दहशतवादाबाबत आपल्याला शून्य सहनशीलता असायला हवी." 

जुन्या व्यवस्थेत बदल होत असतानाही भूतकाळातील असमानता कायम असल्याचे सांगून जयशंकर यांनी नमूद केले की ब्रिक्सची निर्मिती हे मोठे पाऊल आहे.त्याद्वारे खरे बदल घडवून आणता येऊ शकतात.  आर्थिक बदलांचे फायदे सध्या मागे राहिलेल्यांपर्यंत पोहोचतील आणि अधिक न्यायसंगत जागतिक व्यवस्थेची निर्मिती होईल याची खात्री करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले.

"भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आणि गती शक्ती पायाभूत सुविधा यांचे मोठे महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा गठबंधन, जागतिक जैवइंधन गठबंधन, मिशन लाइफ आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट गठबंधन हे सामायिक हिताचे उपक्रम आहेत. नैसर्गिक आपत्ती, आरोग्य आणीबाणी किंवा आर्थिक संकटांमध्ये  आम्ही सर्वांत आधी योगदान देण्याचा प्रयत्न करतो," असे त्यांनी नमूद केले.

शुक्रवारी आयोजित १६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या आऊटरीच/ब्रिक्स-प्लस प्रारूपाच्या सत्रात सीआयएस देशांचे नेते, आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व आणि लॅटिन अमेरिकेतील प्रतिनिधिमंडळे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कार्यकारी संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.