'गरिबांचे बँकर' मोहम्मद युनूस करणार बांगलादेशच्या हंगामी सरकारचे नेतृत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख - मुहम्मद युनूस
बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख - मुहम्मद युनूस

 

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या लाखो निदर्शकांनी कर्फ्यूला झुगारून राजधानीच्या रस्त्यावर मोर्चा काढला आणि पंतप्रधानांच्या घरात प्रवेश केला होता. दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी 'स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन'च्या नेत्यांनी नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मुहम्मद युनूस यांच्या हाती सरकार देण्याची मागणी केली होती.

अशातच बांगलादेशमधून मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशमध्ये हंगामी सरकार आज ८ ऑगस्ट रोजी स्थापन होणार असून नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ महंमद युनूस हेच या सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतील, असे या देशाचे लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान यांनी काल जाहीर केले होते.

नोबेल पुरस्कार विजेते आणि बांगलादेश ग्रामीण बॅंकेचे संस्थापक डॉ. महंमद युनूस हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात. बांगलादेशातील बचत गटांचे प्रवर्तक आणि ग्रामीण बॅंकेच्या संकल्पनेतून छोट्यातील छोट्या घटकाचा विकास घडविणारे युनूस यांना २००६ मध्ये शांततेसाठीचा प्रतिष्ठीत नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होतो. 

‘पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हे युनूस यांच्या कार्याचे मूळ तत्त्व आहे. युनूस आणि त्यांच्या ग्रामीण बॅंकेने बांगलादेशातील गरिबांतील गरिबाला त्याच्या स्वतःच्या पायावर उभे करण्यात आणि विशेषतः महिलांच्या बचत गटाची संकल्पना अमलात आणून त्यांनी महिलांचे जीवनमान उंचावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे,’ असे नोबेल समितीने म्हटले होते.

पत नाही त्यालाच पतपुरवठा. ‘तारण’ नव्हे तर ‘माणूस’ पाहून पतपुरवठा, या ब्रीदवाक्‍यानुसार युनूस यांनी १९७६ मध्ये बांगलादेशात ‘ग्रामीण बॅंके’ची सुरू केली. बांगलादेशातील ६० लाख गरिबांतील गरिबांना त्यातही प्रामुख्याने महिलांना त्याच्या बॅंकेमार्फत कर्ज दिले. त्यात हजारो भिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. नोबेल पुरस्कारानंतर त्यांचे नाव जगभरात पोहोचले. युनूस यांच्या या प्रारूपाने प्रेरित होऊन अमेरिकेसह जगभरात अशा अनेक योजना सुरू झाल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत ‘ग्रामीण अमेरिका’ ही सामाजिक संस्था सुरू केली होती.

शेख हसीनांचे विरोधक
प्रसिद्धीनंतर २००७ मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. पण शेख हसीना यांच्या नाराजीनंतर त्यांना हा विचार सोडावा लागला. हसीना यांनी त्यांना २०११ मध्ये ग्रामीण बँकेच्या प्रमुख पदावरून हटविले. कायद्याने निवृत्तीच्या वयानंतरही ७३ वर्षांचे युनूस पदावर असल्याचा आरोप हसीना यांनी केला होता. त्यांच्या हकालपट्टीला बांगलादेशात मोठा विरोध झाला होता. हजारो नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ मानवी साखळी केली होती.

त्याच वर्षांत कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून युनूस यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. युनूस यांनी स्थापन केलेल्या दूरसंचार कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कामगार कल्याण निधीतून २० लाख डॉलरचा अपहार केल्याचा ठपका ठेवत त्यांच्‍यासह १३ जणांवर खटला दाखल केला होता. भ्रष्टाचार आणि १०० पेक्षा जास्त आरोप त्यांच्यावर आहेत. पण ते सर्व त्यांनी फेटाळले आहेत. ‘‘बांगलादेशमध्ये कोणतीही लोकशाही नाही. केवळ एकच पक्ष सक्रिय असून सर्व गोष्टींवर त्यांचा ताबा आहे. हा पक्ष निवडणुकीत मनमानी करीत जिंकतो,’’ अशी टीका युनूस यांनी हसीना यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी केली.