गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षीय निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळत आहे. आज (दि. ६ नोव्हेंबर ) सकाळपासून अमेरिकेच्या विविध राज्यातील मतदानाचे निकाल हाती येऊ लागले. सुरुवातीपासूनच ट्रम्प यांनी काही राज्यात आघाडी घेतली होती. परंतु मतमोजणीच्या बऱ्याच काळानंतर कमला हॅरिस यांनी जोरदार कमबॅक केले होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कमला हॅरिसकडे यांच्याकडे १७९ इल्कोटोरल वोट्स तर डोनाल्ड ट्रम्प २३० जागांवर आघाडीवर होते.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होणार आहेत. अमेरिकेच्या मीडिया हाउस फॉक्स न्यूजने ट्रम्प यांच्या विजयाची घोषणा केली आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहे.
कमला हॅरिस यांच्या आधी जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांचा थेट सामना होणार होता. पण ऐनवेळी बायडेन यांच्या माघारीमुळे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस व डोनाल्ड ट्रम्प या दोघांनाही अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या जनमत चाचणीमध्ये जवळपास समसमान विजयाची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांना शुभेच्छा
ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत लिहले, “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी खूप छान चर्चा झाली. त्यांच्या नेत्रदीपक विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन. तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
राष्ट्रध्यक्षीय निवडणूकीत विजय मिळवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “ माझ्या प्रत्येक श्वासात अमेरिका आहे. मी अमेरिकावासीयांचे आभार मानतो. हा विजय अमेरिकावासीयांचा आहे. पुढील चार वर्ष अमेरिकेसाठी सुवर्णकाळ असणार आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सर्वकाही असणार आहे.”
पुढे ते एलॉन मस्क यांचे आभार मनात म्हणाले, “ आपल्याकडे एलॉन मस्क यांच्या रुपात एक नवा तारा आहे. त्यांनी मला दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. ते अत्यंत हुशार आहेत. आपल्या अशा हुशार लोकांचं आपण जतन केलं पाहिजे.”
अमेरिकेच्या निवडणूक निकालाचा होणार जागतिक परिणाम
अमेरिकेच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगावर होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली आहे. तर एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये ३२ महिन्यांपासून आणि दुसरीकडे गेल्या एक वर्षापासून गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरू आहेत. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून इस्रायलने लेबनॉनवरही हल्ला केला, त्यामुळे अरब-अमेरिकन मते डेमोक्रॅटिक पक्षाकडे जाऊ लागली.
गाझा आणि लेबनॉन युद्धावर काय परिणाम होईल?
या निवडणुकीत कमला हॅरिस किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा आणि लेबनॉन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. या निवडणूक निकालामुळे गाझा आणि लेबनॉन युद्ध संपण्याची शक्यता फारच कमी आहे.
ट्रम्प यांना शुभेच्छा देण्यासाठी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, “ इतिहासातील सर्वात मोठ्या वापसीच्या शुभेच्छा. व्हाईट हाऊसमध्ये तुमचे परत येणे अमेरिकेसाठी एक नवीन सुरुवात आहे. इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युतीसाठी एक शक्तिशाली वचनबद्धता आहे.”
रशिया-युक्रेन युद्ध थांबेल का?
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या जवळपास ३२ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनला रशियाविरुद्धच्या युद्धात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी मोठ्या लष्करी मदतीची गरज आहे. ऑक्टोबरमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनला नाटोमध्ये शांतता प्रस्तावात समाविष्ट करण्याचे आमंत्रण दिले होते. ही घटना युद्ध जिंकण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल म्हटले होते. मात्र, रशियासोबतचे युद्ध संपल्यानंतरच ते युक्रेनला आमंत्रण देतील असे मत नाटोमधील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांचा आहे.
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले, “ मला सप्टेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेली छान भेट आठवते. यादरम्यान, आम्ही युक्रेन-अमेरिका सामरिक भागीदारी, विजय योजना आणि युक्रेनवरील रशियाची आक्रमकता संपवण्याच्या मार्गांवर चर्चा केली होती.”
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कसा ठरतो?
राष्ट्राध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवार इलेक्टोरल कॉलेजची मतं जिंकण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात.
अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स' देण्यात आलेली आहेत.