अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी या दोन्ही नेत्यांच्यामध्ये द्विपक्षीय संबंधांसाह इतर महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन व्यक्त केले. तसेच फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचा दौरा करतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
याविषयी माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, “आमची फोनवर चर्चा झाली आहे. मोदींशी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर चर्चा केली. बेकायदेशीर स्थलांतरितांना परत घेण्यासंदर्भात भारत योग्य ती कार्यवाही करेल ही अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी हे फेब्रुवारीमध्ये अमेरिका दौऱ्यावर येणार आहेत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यासंदर्भात Xवर पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी सांगितले, “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद वाटला. अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. द्वीपक्षीय संबंधातून दोन्ही देशांचा फायदा आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकांचे कल्याण, जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षेसाठी आम्ही एकत्र काम करू.”
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात इंडो-पॅसिफिक, मध्य पूर्व आणि युरोपमधील सुरक्षा यासारख्या काही प्रमुख प्रादेशिक समस्यांवरही चर्चा झाली आहे. भारताने अमेरिकन बनावटीच्या संरक्षण उपकरणांची खरेदी वाढवावी आणि अधिक संतुलित व्यापार संबंध वाढविण्याकडे वाटचाल करावी असे ट्रम्प यांनी मोदींना सांगितले आहे.
प्रधानमंत्री मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचा दौरा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये त्यांचा शेवटचा भारत दौरा केला होता. मोदी यांनी ट्रम्प यांचे मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहिती आहेत. ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट असेल.
ट्रम्प यांची भारतीय स्थलांतरीविषयी भूमिका
ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची धुरा हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. ट्रम्प यांनी एका दिवसात ४२ निर्णय घेतले. यामध्ये अमेरिकेत अवैधपणे किंवा अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. या निर्णयामुळे वीस हजार भारतीयांना फटका बसण्याची शक्यता आहे.
ट्रम्प सध्या 'अमेरिका प्रथम' मोहिम राबवत आहेत. निवडणुकीदरम्यानच त्यांनी हे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने त्यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच अमेरिकेने दोन लष्करी विमानांतून रविवारी कोलंबियातील नागरिकांना मायदेशी पाठवले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter