आम्ही युद्धाचे नव्हे तर संवाद आणि लोकशाहीचे समर्थक - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

रशियातल्या कझान येथे ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. संवाद आणि लोकशाही व्यवस्थेचे आम्ही समर्थक आहोत, असंही मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानले. मोदी म्हणाले की, मला आज खूप आनंद होतोय. आज पहिल्यांदा ब्रिक्स कुटुंबाच्या रुपाने आपण भेटत आहोत. ब्रिक्स कुटुंबाला जोडलेल्या सर्व नवीन सदस्यांचं आणि सहकार्यांचं मी स्वागत करतो.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, मागच्या वर्षात रशियाच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी राष्ट्रपती पुतिन यांचं मी अभिनंदन करतो. ही परिषद एका अशावेळी होतेय ज्यावेळी जगभरात युद्ध, संघर्ष, आर्थिक अनिश्चितता, वातावरणी बदल, दहशतवाद यासारखी संकटं उभी आहेत.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?
ब्रिक्स परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एक वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मंच म्हणून या परिषदेकडे बघितलं जात आहे. आपला केंद्रबिंदू माणूस असला पाहिजे. आपल्या जगाला हा संदेश दिला पाहिजे की, ब्रिक्स हा फुटीरतावादी ग्रुप नसून लोकहीतकारी ग्रुप आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले, आम्ही युद्धाचं समर्थन करत नाहीत तर आम्हाला संवाद आणि लोकशाही हवी आहे. आपण ज्या पद्धतीने कोविडसारखं संकट परतवून लावलं तसंच आम्ही भावी पिढीची सुरक्षा, सशक्तीकरण आणि समृद्धीसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी सक्षम आहोत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter