अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांचा महत्त्वकांक्षी भारत दौरा सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
 भारतात आल्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स आणि त्यांच्या परिवाराने अक्षरधाम मंदिराला भेट दिली.
भारतात आल्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स आणि त्यांच्या परिवाराने अक्षरधाम मंदिराला भेट दिली.

 

जगभर टॅरिफ वॉरचे मळभ दाटलेले असताना अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. व्हॅन्स हे पत्नी उषा व मुलांसह काही वेळापूर्वी पालम विमानतळावर उतरले. व्हॅन्स यांच्या भारत दौऱ्याकडे अनेक देशाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधील संबंध बळकट करणे, द्विपक्षीय व्यापार वाढवणे, द्विपक्षीय व्यापार करारांना अंतिम स्वरूप देणे आदी महत्वाच्या विषयांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेडी व्हॅन्स यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने जगभरातील अनेक राष्ट्रांवर आयात शुल्क लावलं आहे. या आयात शुल्कामुळे अमेरिकेचा अनेक देशांशी संघर्ष चालू असून अमेरिकेने चीनबरोबर उघड व्यापार युद्ध सुरू केलं आहे. गेल्या दोन तीन आठवड्यांमध्ये अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लागू केलेलं आयात शुल्क तब्बल आठ पटीने वाढवलं आहे. तर, चीनने डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफला (परस्पर आयात शुल्क) प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेवर १४५ टक्के आयात कर लागू केलं आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चीनवरील आयात शुल्क आणखी वाढवले. अशातच अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांचा भारत दौरा सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा आहे. 

अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून जे. डी. व्हॅन्स हे पहिल्यांदाच भारताच्या अधिकृत भेटीवर आले आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी तथा अमेरिकेची सेकेंड लेडी उषा व्हॅन्स आणि त्यांची तीन मुलं, इवान, विवेक आणि मिराबेल देखील आले आहेत. तसेच अमेरिकेच्या प्रशासनातील काही अधिकारी देखील या दौऱ्यात सहभागी आहेत. सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्यांचे विमान दिल्लीतील पालम एअरबेसवर व्हॅन्स यांचे विमान उतरले. 

याविषयी परराष्ट्र मंत्रालायचे सचिव रणधीर जैस्वाल यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स आणि अमेरिकन  शिष्टमंडळाचे स्वागत रेल्वे व माहिती प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव यांनी केले. २१ ते २४ एप्रिल दरम्यान दिल्ली, जयपूर आणि आग्रा येथे होणारी अधिकृत भेट भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीला आणखी मजबूत करेल अशी अपेक्षा आहे."

आज सकाळी दिल्लीत पोहोचल्यानंतर व्हान्स यांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिली. व्हान्स आपल्या कुटुंबासह आग्रा आणि जयपूरला भेट देण्यासाठीही जाणार आहेत. व्हॅन्स हे नुकतेच इटलीला गेले होते. इटली दौरा आटपून ते आता भारतात दाखल झाले आहेत. संध्याकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. व्हॅन्स यांच्या या भारत भेटीतून दोन्ही देशांना काय लाभ होणार हे पुढील दोन तीन दिवसांत स्पष्ट होईल.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter