अमेरिकेने आयातशुल्कवाढीबाबत अखेर भारताला मोठा दिलासा दिला असून, भारतीय सेवा आणि उत्पादनांवरील २६ टक्के वाढीव शुल्कास ९ जुलैपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. व्हाइट हाउसकडून आज रात्री याबाबतचा कायदिश जारी करण्यात आला.
तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी चीनव्यतिरिक्त अन्य देशांवरील आयातशुल्काला नव्वद दिवसांसाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. या देशांवर केवळ दहा टक्के एवढेच वाढीव आयातशुल्क आकारले जाणार होते.
दरम्यान याआधी ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारतीय वस्तू आणि उत्पादनांवर २६ टक्के एवढे आयातशुल्क आकारले होते. थायलंड आणि व्हिएतनाम यांच्यासारख्या देशांशी तुलना करता हे प्रमाण तुलनेने अधिक होते. दुसरीकडे अनेक चिनी उत्पादनांवर अमेरिकेने आकारलेल्या आयातशुल्काचे प्रमाण हे १४५ टक्क्यांवर गेले आहे. काल रात्री ट्रम्प यांनी त्यामध्ये आणखी वाढ केली.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आशियाई आणि युरोपीय शेअर बाजारांनी आठ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. त्यामुळे उद्या (ता. ११) भारतीय शेअर बाजारदेखील तीन ते चार टक्के नफा दाखवून पडझडीपूर्वीच्याच पातळीवर जातील अशी चिन्हे आहेत. ट्रम्प यांच्या बहुचर्चित वाढीव आयातशुल्क अंमलबजावणीची मुदत जवळ आल्यानंतर जगातील सर्व शेअर बाजार तीन ते चार दिवसांत जवळपास आठ ते दहा टक्क्यांपर्यंत घसरले होते. मात्र काल ट्रम्प यांनी चीन वगळता अन्य देशांवरील आयातशुल्कास स्थगिती दिली.
जगातील सर्वच शेअर बाजारांनी आज त्याचे स्वागत केले. आज भारतीय शेअर बाजार बंद असले तरी आजचे चार कल बघता उद्या निफ्टी ७०० ते ८०० अंशांपर्यंत नफा दाखवीत उघडेल, म्हणजेच सेन्सेक्सदेखील दोन ते अडीच हजार अंश वाढ दाखवीत उघडेल, अशी चिन्हे आहेत.