भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन म्हणजे एफबीआय (FBI) या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदी नियुक्ती झाली आहे. अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृह सिनेटने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. गुरुवारी झालेल्या मतदानात त्यांना ५१-४९ अशा अल्प बहुमताने या पदावर निवडून आले. रिपब्लिकन पक्षाच्या सुसान कॉलिन्स आणि लिसा मक्रोव्स्की यांनी देखील डेमोक्रॅटीक पक्षाच्याबरोबर पटेल यांच्या नियुक्तीच्या विरोधात मत दिले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाची निवडणुकी जिंकल्यानंतर लगेत पटेल यांच्याकडे एफबीआयची जबाबदारी सोपवली जाईल अशी घोषणा केली होती, आता यावर सिनेटने देखील शिक्कामोर्तब केले आहे. पटेल यांनी यापूर्वी डिफेंडर आणि न्याय विभागात दहशतवाद विरोधी अभियोक्ता म्हणून काम केले आहे.
एफबीआय संचालक म्हणून काश पटेल यांचा कार्यकाळ हा १० वर्षांचा असणार आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी क्रिस्टोफर रे यांनी राजीनामा दिला होता. आता त्यांची जागा काश पटेल यांनी घेतली आहे.
पटेलांची पोस्ट व्हायरल
सिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर पटेल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "एफबीआय जगातील प्रत्येक कोपऱ्यात अमेरिकन लोकांना हानी पोहोचवणाऱ्यांचा पाठलाग करेल. हा आमचा इशारा समजा."
भारतीय वंशाचे काश पटेल
काश पटेल यांचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला. १९७० च्या दशकात युगांडाचे शासक इदी अमीन यांनी देश सोडण्याचा आदेश दिल्यानंतर काश पटेल यांचे कुटुंब कॅनडामार्गे अमेरिकेत आले. १९८८ मध्ये, पटेल यांच्या वडिलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. त्यानंतर त्यांना एका विमान कंपनीत नोकरी मिळाली.
२००४ मध्ये कायद्याची पदवी पूर्ण केल्यानंतर, पटेल यांना एका मोठ्या लॉ फर्ममध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी सरकारी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
काश पटेल २०१३ मध्ये वॉशिंग्टनमधील न्याय विभागात सामील झाले. त्याठिकाणी तीन वर्षे काम केल्यानंतर, २०१६ मध्ये त्यांची गुप्तचर विभागाशी संबंधित स्थायी समितीवर कर्मचारी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. या विभागाचे प्रमुख डेव्हिड न्युन्स होते.