आता दुबई, UAE मध्ये करता येणार UPI ने पेमेंट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
 दुबई, UAE मध्ये करता येणार UPI ने पेमेंट
दुबई, UAE मध्ये करता येणार UPI ने पेमेंट

 

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सुविधा राबवणाऱ्या एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लि.ने संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) नेटवर्क इंटरनॅशनल (नेटवर्क) सोबत भागीदारी केली असून, त्याद्वारे नेटवर्कच्या पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल्सद्वारे क्यूआर कोड आधारित पेमेंट करणे शक्य झाले आहे.

या सुविधेमुळे भारतीय पर्यटक आणि अनिवासी भारतीयांना नेटवर्क इंटरनॅशनलच्या यूएईमधील व्यापारी नेटवर्कमध्ये सुरक्षित व्यवहार करता येणार आहेत. नेटवर्कमध्ये रिटेल, हॉस्पिटॅलिटी, ट्रान्सपोर्ट आणि सुपरमार्केट यांसह इतर क्षेत्रातील साठ हजारांपेक्षा अधिक व्यापाऱ्यांमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त पीओएस टर्मिनल आहेत. तिथे आता सहजपणे यूपीआय पेमेंट करता येणार आहे. 

"नेटवर्क इंटरनॅशनलसोबतची आमची भागीदारी यूएईमध्ये यूपीआयची उपस्थिती वाढवेल. यूएईमधील व्यापाऱ्यांमध्ये यूपीआय पेमेंटबाबत स्वीकृती वाढवून, आम्ही भारतीय प्रवाशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावीन्यपूर्ण डिजिटल पेमेंट सुविधेच्या वापरासाठीही प्रोत्साहन देत आहोत," असे एनपीसीआय इंटरनॅशनलचे सीईओ रितेश शुक्ला यांनी सांगितले.

गल्फ को ऑपरेशन काउन्सिल (जीसीसी) देशांमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या २०२४ मध्ये ९८ लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज असून, यूएईने भारतातून ६२ लाख ९० हजार लोकांच्याआगमना ची अपेक्षा केली आहे. पीओएस टर्मिनल्सद्वारे यूपीआय पेमेंट सक्षम केल्यामुळे भारतीय पर्यटक आणि भारतीय बँक खाती असलेल्या अनिवासी भारतीयांना यूएईमधील नेटवर्कच्या पीओएस टर्मिनलवर पेमेंटसाठी यूपीआय वापरण्याची परवानगी मिळेल. दोन संस्थांमधील ही भागीदारी एक मजबूत डिजिटल पेमेंट इकोसिस्टीम तयार करेल आणि त्यामुळे कॅशलेस व्यवहार वाढतील, असे नेटवर्क इंटरनॅशनलचे ग्रुप सीईओ नंदन मेर म्हणाले,