UK Election Results : लेबर पार्टी करणार सत्ता स्थापन

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 3 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

भारतासह जगभर निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अमेरिकेसह ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्रिटनमध्ये सत्ताबदल होण्याचे संकेत मिळत होते. ताज्या बातमीनुसार ऋषी सुनक यांनी पराभव स्वीकारला असून  कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वातील लेबर पार्टी सत्ता स्थापन करणार आहे. ऋषी सुनक आणि त्यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

एक्झिट पोलमध्ये लेबर पार्टीला प्रचंड बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लेबर पार्टी ४१० जागा मिळवेल, तर कंझर्व्हेटिव्ह पार्टीला फक्त १३१ जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. ब्रिटनमध्ये एकूण ६५० जागांसाठी मतदान झाले. बहुमत गाठण्यासाठी पक्षांकडे ३२६ जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे लेबर पार्टी सहज बहुमत मिळवत असल्याचं दिसतंय. बीबीसीने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. 

अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, महागाई, स्थलांतर अशा काही मुद्यांमुळे ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीची सत्ता जाण्याची चिन्हे दिसत होती . गेल्या दहा वर्षांपासून ऋषी सुनक हे सत्तेत होते. ऋषी सुनक यांच्या विरोधात पक्षातून अंतर्गत गट तयार झाला होता. त्यामुळे सुनक यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

सध्या लेबर पार्टीने ३९२ जागांवर आघाडी घेतली आहे, तर कंझर्व्हेटिव्ह पार्टी १०१ जागावर आघाडीवर आहे. लेबर पार्टी बहुमताचा आकडा सहज पार करत असल्याचं सध्याचं चित्र आहे. एक्झिट पोलमध्ये देखील लेबर पार्टीच्या प्रचंड विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक्झिट पोलनुसारच सध्याचा कल दिसत आहे.

ऋषी सुनक यांना आव्हान देणारे कीर स्टार्मर कोण?
कीर स्टार्मर २०१५ मध्ये लंडनमधून पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. ते पेशाने वकील आहेत. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कीर स्टार्मर यांच्या लेबर पार्टीची निराशाजनक कामगिरी होती. त्यानंतर आज जे पक्षाला यश मिळतंय, त्याचं सगळं श्रेय कीर स्टार्मर यांना जातं. 
विशेष म्हणजे भारतातल्या काश्मीर प्रश्नावर पक्षाचे माजी नेते जेरेमी कॉर्बिन यांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे नाराज झालेल्या भारतीयांची मन वळवण्यात स्टार्मर यांना यश आलं. आज कीर हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

मागच्या वर्षी त्यांनी एका भाषणात भारतासोबत जागतिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षेच्या आधारावर संबंध मजबुत करण्याची मागणी केली होती. स्टार्मर यांच्या जाहीरनाम्यातही भारतासोबत नवीन धोरणात्मक भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त करत सुरक्षा, शिक्षण, तंत्रज्ञान या विषयात सहकार्य वाढवण्याचं आश्वासन दिलेलं आहे.

त्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर लंडन येथील श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली होती. ब्रिटनमधल्या हिंदू समूदायाला आश्वासन देत हिंदूफोबियाला स्थान दिले जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter