दहशतवादी हल्ल्याने तुर्कीये हादरले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 d ago
तुर्कीमध्ये दहशतवादी हल्ला
तुर्कीमध्ये दहशतवादी हल्ला

 

तुर्कीची राजधानी अंकारा येथे मुंबईतील 26/11 प्रमाणे दहशतवादी हल्ला झालाय. येथील एव्हिएशन कंपनी तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीज (TUSAS) च्या मुख्यालयाबाहेर मोठा दहशतवादी हल्ला झालाय. तेथे दोन दहशतवादी सतत हल्ले करत असून त्यांनी अनेक नागरिकांना बंधक बनवले आहे. या दहशतवादी हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात हा हल्ला आत्मघातकी बॉम्बस्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्कीच्या सरकारमधील मंत्री अली येरलिकाया यांनी याला दहशतवादी हल्ला म्हटलंय. मंत्री अली येरलिकाया यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या एक्सवरून प्रतिक्रिया दिलीय. तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. दुर्दैवाने आमचे जवान शहीद झाले असून अनेक लोक जखमी झाले आहेत. अशी पोस्ट त्यांनी केलीय.

तुर्कस्तानमधील अंकारा येथील TUSAS एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या मुख्यालयावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी कंपनीत घुसून मुख्यालयातील लोकांना ओलीस ठेवले आहे. या ओलीसांच्या सुरक्षित सुटकेसोबतच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम सुरू केलीय. हल्ल्याच्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.

सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून त्यांनी जखमींना रुग्णालयात नेले आहे. दरम्या न आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याच दहशतवादी संघटनेने घेतली नाहीये. तर तुर्कीच्या सरकारने याला दहशतवादी हल्ला असं म्हटलंय.

या हल्ल्यात तुर्कीच्या सुरक्षा दलातील विशेष दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. दरम्यान ज्याने नागरिकांना ओलीस ठेवले आहे, तो दहशतवादी अद्याप जिवंत आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून ओलिसांच्या सुटकेसाठी विशेष मोहीम सुरू आहे.