काश्मीरच्या मुद्यावर तुर्कीचा हस्तक्षेप अस्वीकार्य - परराष्ट्र मंत्रालय

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 8 h ago
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रजब तैयब एर्दोगान
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रजब तैयब एर्दोगान

 

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रजब तैयब एर्दोगान हे पाकिस्तानचा दौरा करत असताना काश्मीरच्या मुद्द्याला महत्त्व देत आहेत. एर्दोगान यांनी पाकिस्तानमध्ये असताना काश्मीरच्या समस्येबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत आणि तुर्की यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भारताने एर्दोगान यांच्या या वक्तव्याची तीव्र निंदा केली आहे आणि त्यांना कश्मीरच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालय यावर अत्यंत स्पष्टपणे बोले आहे.  

याविषयी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, “एर्दोगान यांनी केलेले वक्तव्य अस्वीकार्य आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अभिन्न भाग आहे. आम्ही भारतासाठी शाश्वत असलेल्या मुद्द्यांवर अशी आपत्तिजनक टिप्पणी नाकारतो. आम्ही तुर्कीच्या राजदूतासमोर या वक्तव्याचा तीव्र विरोध केला आहे. भारताची प्रादेशिक अखंडता आणि संप्रभुता याविषयीची चुकीची विधाने आम्हाला अमान्य आहेत.” 

पुढे ते म्हणाले, “एर्दोगान यांनी भारताच्या आंतरिक बाबींवर टिप्पणी करण्याऐवजी, भारताविरुद्ध सीमा पार दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानच्या धोरणावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. पाकिस्तानच्या या धोरणामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे."

एर्दोगान यांनी एका आठवड्यापूर्वी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले आहे. एर्दोगान यांनी इस्लामाबादच्या दौऱ्यादरम्यान काश्मिर संबंधी वक्तव्य केले होते. तिथे त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली होती. गेल्या दोन वर्षांपासून एर्दोगान कश्मीरच्या मुद्द्यावर मत मांडत आहेत. 

एर्दोगान यांनी कश्मीर विषयावर काय म्हटले?
१३ फेब्रुवारीला तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत म्हटले की, कश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेद्वारे सोडवला जावा. कश्मीरच्या मुद्द्याचे निराकरण बोलून संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावानुसार आणि कश्मीरच्या लोकांच्या आकांक्षांना लक्षात ठेवून केले जावे. आमचे राज्य आणि आमचा देश पूर्वीप्रमाणेच आजही आमच्या कश्मीरी बांधवांसोबत एकजूट आहे."

तुर्की आणि भारताचे संबंध 
तुर्की आणि भारत यांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध खूप महत्त्वाचे आहेत. दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन मैत्रीचा इतिहास आहे, परंतु काही मुद्द्यांवर मतभेद देखील आहेत. राजकीय दृष्टिकोनातून भारत आणि तुर्कीने एकमेकांच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर सहकार्य केले आहे. दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये अनेक वेळा एकमेकांना पाठिंबा दिला आहे. परंतु एर्दोगान यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने राजकीय आणि लष्करी धोरणांच्या बाबतीत नेहमीच आपली भूमिका स्पष्ट केली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter