प्राणघातक हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि सध्याच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाला. पेनसिल्वानिया येथे प्रचारसभेत ते बोलत असताना एका हल्लेखोराने दूर अंतरावरून रायफलने त्यांच्यावर गोळीबार केला. यापैकी एक गोळी उजव्या कानाला चाटून गेल्याचे ट्रम्प यांनीच सांगितले. तर, प्रेक्षकांमधील एका व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला. हल्लेखोराला जागीच ठार मारण्यात आले. या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला आहे.

येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणूक होत आहे. ट्रम्प यांना अद्याप अधिकृत उमेदवारी मिळाली नसली तरी ती केवळ औपचारिकता असणार आहे. विद्यमान अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते ज्यो बायडेन हे त्यांचे प्रतिस्पर्धी असतील. ट्रम्प यांची आज बटलर टाऊन येथे मोकळ्या मैदानात प्रचारसभेत ट्रम्प बोलत असतानाच त्यांच्यासमोर दोनशे ते तीनशे फूट अंतरावरील एका पत्र्याच्या शेडच्या छतावरून हल्लेखोराने रायफलच्या साह्याने गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. त्यामुळे ट्रम्प तत्काळ खाली बसले आणि त्यांच्याभोवती सुरक्षा रक्षकांनी कडे केले. ट्रम्प हे मिनिटभरातच उभे राहिले आणि सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातून निघून गेले. मात्र, त्यांच्या उजव्या कानातून रक्त येत असल्याचे दिसत होते. सभास्थानावरून जातानाही ट्रम्प यांनी हाताची मूठ दाखवत आपल्या समर्थकांना दिलासा दिला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोराला ठार मारले. थॉमस मॅथ्यू क्रूक्स (वय २०) असे हल्लेखोर युवकाचे नाव असून तो रिपब्लिकन पक्षाचाच नोंदणीकृत सदस्य होता.

रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ट्रम्प घरी गेले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ‘‘आपल्या देशात अशी घटना घडू शकते, हे धक्कादायक आहे. गोळी माझ्या उजव्या कानाच्या वरील भागाला लागली.’’ ट्रम्प यांना १५ जुलैला पक्षातर्फे अधिकृतरीत्या उमेदवारी दिली जाणार आहे. गोळीबाराच्या घटनेनंतरही ट्रम्प हे आपल्या पुढील प्रचारसभा नियोजनानुसार घेणार असून लवकरच ते देशाचे नवे अध्यक्षही बनतील, असा विश्‍वास त्यांच्या कार्यालयामार्फत व्यक्त करण्यात आला आहे.

सुरक्षेत त्रुटी
अमेरिकेच्या माजी अध्यक्षांवर गोळीबार झाल्याने जगभरात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मात्र, एवढी सुरक्षा असताना एक वीस वर्षांचा युवक अत्याधुनिक रायफल घेऊन कार्यक्रमस्थळाच्या नजीक पोहोचलाच कसा, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ही सुरक्षेतील त्रुटी असल्याचे मान्य करून चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर सभेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

बायडेन यांच्याकडून विचारपूस
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेमध्ये हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बायडेन यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत विचारपूसही केल्याचे ‘व्हाइट हाऊस’तर्फे सांगण्यात आले. बायडेन यांच्याबरोबरच बराक ओबामा, जॉर्ज डब्लू. बुश आणि बिल क्लिंटन या माजी अध्यक्षांनीही हल्ल्याचा निषेध केला.

जीवघेण्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची काय होती पहिली प्रतिक्रिया?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. पेनसिल्व्हेनिया येथे निवडणूक रॅलीदरम्यान स्टेजवर भाषण करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारामध्ये डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. या गोळीबारामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार टीमच्या वरिष्ठ सल्लागारांच्या मते त्यांची प्रकृती आता ठीक आहे. या घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या गोळीबारानंतर राष्ट्रीय एकात्मतेचे आवाहन करत म्हटले की, 'आम्ही एकजूट राहणे हे नेहमीपेक्षा महत्त्वाचे आहे.' त्याचवेळी गोळीबार करणाऱ्याला सीक्रेट सर्व्हिसच्या सदस्याने गोळ्या झाडून ठार केले. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितले की, 'अकल्पनीय घटना घडण्यापासून देवानेच रोखले. देवाने मला वाचवले आहे. यावेळी आपण एकजूट राहणे आणि अमेरिकन म्हणून आपले खरे चरित्र दाखवणे, मजबूत आणि दृढनिश्चयी रहाणे आणि वाईटाचा विजय होऊन देऊ देणे हे नेहमीपेक्षा महत्त्वाचे आहे.'

रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितले की,'आम्ही घाबरलो नाही. आमचे प्रेम इतर पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांशी आहे.' दरम्यान, ही घटना रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी घडली. ट्रम्प अधिकृतरित्या ५ नोव्हेंबरला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार होणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार टीमने सांगितले की, 'माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मिलवॉकीमध्ये तुम्हा सर्वांशी संपर्क साधण्यास उत्सुक आहेत. आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचे त्यांचे व्हिजन शेअर करत राहतील.' दरम्यान, या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन यांनी देखील ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधात पंतप्रधान मोदींनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. 'माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. ट्रम्प यांना लवकर बरे वाटावे, अशी मी कामना करतो. या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या, जखमी झालेल्यांच्या आणि अमेरिकी नागरिकांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.