भारत कॅनडातील कटुतेसाठी ट्रुडोच जबाबदार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 3 h ago
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन  ट्रुडो आणि पंतप्रधान मोदी
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आणि पंतप्रधान मोदी

 

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये निर्माण झालेल्या कटुतेसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हेच जबाबदार असून ते भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा रोष आज भारताने व्यक्त केला. पुरावे नसल्याबाबत कॅनडाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या कबुलीमुळे आमचे म्हणणे सिद्ध झाल्याचा दावाही परराष्ट्र मंत्रालयाने केला.

"खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणाची भारताला केवळ गुप्तचरांनी दिलेली माहिती देण्यात आली होती आणि त्याचे कोणतेही ठोस पुरावे दिले नव्हते, अशी कबुली कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टूडो यांनी दिली आहे. या प्रकरणी भारताचीही भूमिका अतिशय स्पष्ट आहे. सप्टेंबर २०२३ पासून कॅनडा सरकारने कोणतीही माहिती आम्हाला पुरविलेली नाही. 

कॅनडाने केलेले आरोप गंभीर आहेत. पण त्यांच्या पुष्ट्यर्थ आतापर्यंत कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. आता टुडो यांनी स्वतःच त्याची कबुली दिली आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. या प्रकरणी अधिक माहिती देताना जयस्वाल म्हणाले, "कॅनडातील भारताचे उच्चायुक्त आणि पाच अन्य राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेविषयी आमचा कॅनडाच्या विद्यमान सरकारवर विश्वास नसल्यामुळेच आम्ही त्यांना परत बोलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कॅनडा सरकारने भारतीय अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगितले. पण त्यांच्या निर्णयापूर्वीच आम्ही अधिकाऱ्यांना परत बोलविले होते. कॅनडाच्या हंगामी उच्चायुक्तांना पाचारण करून ही माहिती देण्यात आली. 

भारत आणि कॅनडाचे संबंध, विशेषतः आर्थिक संबंध अतिशय भक्कम आहेत. कॅनडाच्या पेंशन फंडांनी भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, तर कॅनडामध्ये भारताचे मोठ्या संख्येने नागरिक राहतात. कॅनडामध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. टुडो सरकारच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे हा पेचप्रसंग चिघळला आहे."

'गुन्हेगारांवर कॅनडाची कारवाई नाही'
जयस्वाल म्हणाले, कॅनडामध्ये सक्रिय असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडांच्या प्रत्यार्पणासह गेल्या एक दशकापासून २६ विनंत्या प्रलंबित आहेत. शिवाय गुरजिंदर सिंग, गुरजीत सिंग, गुरप्रीत सिंग, लखबीरसिंग लांडा आणि अर्शदीपसिंग गिल या दहशतवाद्यांसह विविध गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या गुंडांना अटक करण्यात यावी किंवा कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी म्हणून केलेल्या विनंत्याही प्रलंबित आहेत. पण आतापर्यंत कॅनेडा सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. या गुन्हेगारांसाठी कॅनडा सरकार भारतालाच दोष देत आहे. कॅनडातील भारतीय वंशाच्या पत्रकारांना धमकावण्यात येत आहे. हा सर्व प्रकार गंभीर आहे."

पुरावे नसल्याची ट्रुडोंची कबुली
■ ओटावा (कॅनडा) खलिस्तानवादी निज्जर हत्याप्रकरणात भारत सरकारचा थेट हात असल्याचा अनेक दिवसांपासून आरोप करत असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टूडो यांनी आज, 'आमच्याकडे केवळ गुप्तचर विभागाकडून मिळालेली माहिती आहे, सबळ पुरावे नाहीत' असा खुलासा केला आहे. त्यांच्या या खुलाशानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्यावर जोरदार टीका केली असून 'टूडो यांच्यामुळेच भारत-कॅनडा संबंध बिघडले' असल्याचा दावा केला आहे.