दहशतवादाच्या छायेत व्यापार अशक्य - परराष्ट्रमंत्री जयशंकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
SCO कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंटच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
SCO कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंटच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

 

"दहशतवाद, कट्टरतावाद आणि फुटीरतावाद या तीन अनिष्ट शक्तींनी प्रेरित कारवाया सीमाभागात होत असतील तर व्यापार आणि दळणवळण यांच्यावर निश्चितच परिणाम होतो.

व्यापार सुरू राहण्यासाठी भौगोलिक एकात्मता आणि सार्वभौमता यांची जाणीव ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते," असे सुनावत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे टोला मारला. विश्वास गमावला गेला असेल तर तो परत मिळविण्यासाठी प्रामाणिकपणे संवाद साधला जाणेही आवश्यक आहे, असेही जयशंकर यांनी फटकारले.

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी जयशंकर हे मंगळवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल झाले. भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावपूर्ण संबंध असल्याच्या आणि राजनैतिक व्यवहार बंद असल्याने जयशंकर यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. सुमारे नऊ वर्षांनंतर भारताचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानमध्ये गेले आहेत. या परिषदेला चीनचे पंतप्रधान ली चिआंग यांच्यासह इतर सदस्य देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत.  

पाकिस्तानकडून दहशतवादाचा होणारा वापर आणि चीनच्या सैन्याकडून पूर्व लडाखमध्ये होत असलेले घुसखोरीचे प्रयत्न या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी परिषदेमध्ये केलेल्या भाषणात या दोन्ही देशांना आरसा दाखविला. जयशंकर म्हणाले, "सीमाभागात होणाऱ्या कारवायांमध्ये दहशतवाद, कट्टरतावाद आणि फुटीरतावाद पसरविणे हा हेतू असेल, तर व्यापार, दळणवळण, नागरिकांमधील देवाण-घेवाण यांना प्रोत्साहन मिळणे अशक्य आहे. दोन देशांमधील सहकार्य हे परस्पर आदर आणि सार्वभौमता यांच्यावर अवलंबून असते. एकमेकांवर पूर्ण विश्वास दाखवून वाटचाल केल्यास 'एससीओ'तील प्रत्येक सदस्याला प्रचंड फायदा होऊ शकतो. परस्पर विश्वास, मैत्री आणि शेजारधर्म यांना बळ देणे हाच या संघटनेचा उद्देश आहे." 

दोन देशांचा एकमेकांवरील विश्वास गमावला गेला असल्यास प्रामाणिकपणे संवाद साधला जाणे अत्यंत आवश्यक आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. 'प्रत्येक देशाने एकमेकांच्या भौगोलिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करायला हवा. एकतर्फी अजेंडा राबवून भागीदारी करता येत नाही. आपल्याला फायदेशीर ठरतील तेवढेच नियम पाळल्यानेही हे साध्य करता येत नाही,' असेही जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानचे नाव न घेता सुनावले. दरम्यान, ही परिषद आटोपून जयशंकर हवाई दलाच्या मेघदूत विमानातून मायदेशी परतले.

चीनकडून पाठराखण
वाद असलेल्या भूभागाबाबत कोणताही एकतर्फी निर्णय घेण्यास आमचा विरोध असल्याचे सांगत चीनने आज पाकिस्तानची पाठराखण केली. चीनचा रोख जम्मू-काश्मीरमधील ३७० वे कलम हटविण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाकडे असल्याचे मानले जाते. चीन आणि पाकिस्तानने आज संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत भूमिका मांडली आहे. 'दक्षिण आशियामध्ये शांतता कायम राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व प्रादेशिक वाद मिटविणे आणि वादातील भूभागाबाबत एकतर्फी घेतलेल्या निर्णयाला विरोध करणे गरजेचे आहे,' असे या निवेदनात म्हटले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter