सीरियाच्या समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या हिंसाचारामध्ये १,३८३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक अलावी समाजाचे लोक आहेत. ही माहिती एका युद्ध निरीक्षण संस्थेने दिली. तज्ञांचे मते सीरियातील सुरक्षा दल अलावी समाजाच्या लोकांना त्यांच्या घरात जाऊन ठार मारत आहेत.
सीरियामधील हिंसा
सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सनुसार, हजारो सामान्य नागरिकांची हत्या सुरक्षा दल आणि त्यांच्या सहयोगी गटांनी केले आहे. या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या आठवड्याभरापासून हिंसा सुरू आहे. याठिकाणी सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचा अलावी समाज राहतो.
ब्रिटनमधील संस्थेने सांगितले की, ही हिंसा आता थोडी शांत झाली आहे. पण अजूनही याठिकाणी मृतदेह सापडत आहेत. यातील काही मृतदेह शेतात आणि घरांमध्ये आढळले आहेत.
सीरियामधील ही माहिती लटाकिया, टार्टस आणि हमा येथून आली आहे. ऑब्झर्वेटरीने सुरक्षा दल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सामान्य लोकांना जबरदस्तीने घरातून बाहेर काढणे, त्यांची घरं जाळणे आणि त्यांना मारण्याचे आरोप केले आहेत. यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही.
सीरियामधील हिंसा कशी भडकली?
बशर अल असद यांच्या समर्थक बंदूकधारकांनी सीरियातील नवीन सुरक्षा दलांवर हल्ला केला. त्यावेळी ही हिंसा भडकली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या लढायांमध्ये किमान २३१ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ऑब्झर्वेटरीने सांगितले की, असद समर्थकांमधील २५० लोकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने सांगितले की, ही हिंसा धर्माच्या आधारावर केली गेल्याचे दिसतं.
सामान्य नागरिकांच्या रक्तपातात सामील असलेल्या व्यक्तींना शिक्षा देण्याचे आणि एक तपास समिती स्थापन करण्याचे वचन सिरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल-शराआ यांनी दिले आहे. अहमद अल-शराआ हा बशर अल असद विरोधी असणाऱ्या सुन्नी इस्लामी गट हयात तहरीर अल-शाम चा प्रमुख आहे. या प्रकरणात सीरियाच्या सरकारने सात संशयित लोकांना अटक केली आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter