पश्चिम आशियावरील युद्धाचे ढग झाले आणखी गडद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दक्षिण लेबनॉनमध्ये इस्त्रायली लष्कर आणि हिज्बुल्लाच्या दहशतवाद्यांमध्ये युद्ध सुरू झाले असून, या संघर्षात आमचे आठ सैनिक मारले गेल्याचा दावा इस्राईलने केला आहे. इराणने इस्त्राईलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियावर युद्धाचे ढग जमा झाले आहेत. इराणने हा हल्ला स्वसंरक्षणासाठी केल्याचा दावा केला असून, इस्त्राईलने मात्र आम्ही त्याचा बदला घेऊ, असे म्हटले आहे.

दुसरीकडे या हल्ल्याचा निषेध न केल्याबद्दल इस्त्राईलने संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) प्रमुख अँटोनिओ गुटेरस यांना देशामध्ये येण्यास बंदी घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या संघर्षामुळे आज जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती सुमारे चार टक्क्यांनी वाढल्या असून, अमेरिकेत 'एस अँड पी ५००' निर्देशांकात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे.
 
मायक्रोसॉफ्टसारख्या आयटी कंपन्यांचे शेअर घसरल्याने निर्देशांक गडगडले. क्रूड ऑइलचे (ब्रेट) भाव प्रत्येक पिंपामागे (प्रति बॅरल) ७४.२ डॉलरवर पोहोचले, तर अमेरिकेतील टेक्सास इंटरनॅशनल क्रूड ऑईलचे भाव अडीच डॉलरने म्हणजेच ३.७ टक्क्यांनी वाढून ७०.७ डॉलरवर पोहोचले. आखाती देशातील तणावांमुळे बाजारपेठ चिंताग्रस्त असल्याचे 'रिटहोल्ड्स वेल्थ मॅनेजमेंट'चे केली कॉक्स यांनी सांगितले.

इराणकडून लष्करी तळे लक्ष्य
इराणने इस्त्राईलवर मंगळवारी रात्री १८० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. इस्त्रायली डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) दिलेल्या माहितीनुसार 'मोसाद'चे मुख्यालय आणि हवाई तळ यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. इस्त्राईलच्या संरक्षक प्रणालीने इराणची बहुसंख्य क्षेपणास्त्रे ही हवेतच नष्ट केली होती.
 
या हल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे इस्त्राईलकडून सांगण्यात आले. लेबनॉनमध्ये इस्त्राईल आणि हिज्बुल्ला यांच्यात समोरासमोरची लढाई सुरू झाली असून बुधवारी दोन्ही गटाचे सैनिक समोरासमोर आल्याने तणाव आणखी वाढला होता. या संघर्षामध्ये २ सैनिकांचा मृत्यू झाला असून अन्य अठराजण हे जखमी झाले आहेत. 

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हटले की, "इराणने आमच्यावर क्षेपणास्त्र हल्ला करून मोठी चूक केली असून याची जबर किंमत त्यांना चुकवावी लागणार आहे." 

भारत सरकारकडून मार्गदर्शक सूचना
पश्चिम आशियातील तणाव वाढत असल्याने भारत सरकारने आपल्या
नागरिकांना इराणमधील अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात इराणमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे.
 
सध्या या भागातील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. इस्त्राईलमधील तेलअवीव येथील भारतीय दूतावासाने नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 

संघर्षाच्या आघाडीवर
* इराणकडून हल्ल्यासाठी फतेह क्षेपणास्त्रांचा वापर

* इस्त्राईलचे बैरुतमध्ये हवाई हल्ले

* हौती बंडखोरांच्या ठाण्यांवरही इस्त्राईलकडून हल्ले

* चीनने लेबनॉनमधून आपल्या नागरिकांना हलविले 

* अमेरिकेला संघर्षापासून दूर राहण्याचा इराणचा इशारा

* इराणच्या तेलसाठ्यांवर इस्त्राईलकडून हल्ले शक्य

* इराणने सर्व विमानांची उड्डाणे रोखली

* इराणच्या हल्ल्याचा ऑस्ट्रेलियाकडून निषेध

* डेन्मार्कमध्ये इस्त्रायली दुतावासाबाहेर स्फोट