अमेरिकन लष्कराने ट्रान्सजेंडर व्यक्तींना सैन्यात सामील होण्यापासून घातली बंदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नुकतीच अमेरिकेच्या लष्करीदलाने ट्रान्सजेंडर व्यक्तींना सैन्यात सामील होण्याची परवानगी देणार नसल्याची घोषणा केली. तत्पूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर ट्रान्सजेंडर समुदायाला सैन्यात भरती करू नये असे आदेश दिले होते. 

याविषयी माहिती देताना अमेरिकेच्या लष्कराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहले, “अमेरिकेच्या लष्कर ट्रान्सजेंडर व्यक्तींना सैन्यात सामील होण्याची परवानगी देणार नाही. तसेच लष्करी सदस्यांसाठी लिंग संक्रमणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार किंवा प्रक्रिया करणे थांबवले आहे. लिंग विकार असलेल्या व्यक्तींना आदर आणि सन्मानाने वागवले जाईल, परंतु लिंग-मान्यता उपचार पुढे सुरू ठेवले जाणार नाहीत.” 

पुढे त्यांनी सांगितले, “नवीन आदेशानुसार लिंग विकार असलेल्या व्यक्तींना सैन्यात प्रवेश दिला जाणार नाही. लिंग संक्रमणाच्या प्रक्रियेच्या कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपचारांवर अस्थायी बंदी घालण्यात आली आहे.” 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २७ जानेवारीला कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की जन्मतः असलेल्या लिंगाशी भिन्न असलेले लिंग ओळखणे सैनिकांच्या शिस्ती आणि सद्गुणाच्या जीवनशैलीला विरोध करते. 

२०१६ मध्ये बराक ओबामा प्रशासनाने ट्रान्सजेंडर व्यक्तींना लष्करात सामील होण्याची परवानगी दिली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर सैनिकांवर बंदी घालण्याचे वचन तेथील नागरिकांना दिले होते.    मियामी, फ्लोरिडामध्ये झालेल्या एका रिपब्लिकन परिषदे दरम्यान, ट्रम्प यांनी आणखी एकदा ट्रान्सजेंडर सैनिकांवर बंदी घालण्याच्या आपल्या योजनेवर ठाम राहण्याचे सांगितले होते. त्यांनी सांगितले, "दुनियेत सर्वात शक्तिशाली लष्करी दल असण्यासाठी, आपल्याला ट्रान्सजेंडर विचारधारेला सैन्यापासून बाहेर काढणे आवश्यक आहे."

या निर्णयामुळे अमेरिकेतील ट्रान्सजेंडर समुदायात चिंता आणि असंतोष व्यक्त होत आहे. ट्रान्सजेंडर अधिकारांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या निर्णयावर टीका केली आहे. या संघटना ट्रान्सजेंडर लोकांना  लष्करी सेवेत समान संधी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अनेक ट्रान्सजेंडर सैनिकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते न्यायालयात या निर्णयाविरोधात लढण्याची तयारी करत आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter