सीरियामधील सरकारविरोधी सशस्त्र गटांनी आज सरकारचे नियंत्रण असलेल्या भागांवर मोठा हल्ला केला आणि काही भागाचा ताबाही मिळविला. याला प्रत्युत्तर म्हणून सरकारी सैन्यदलांनी या भागामध्ये जोरदार हवाई हल्ले केले, तसेच रणगाड्यांद्वारेही तोफगोळ्यांचा मारा केला.
सीरियामधील नैऋत्य भागात हा संघर्ष झाला. सशस्त्र गटांना तुर्कियेचा पाठिंबा असून रशिया आणि इराणचे मात्र सीरिया सरकारला पाठबळ आहे. दोन्ही बाजूंमध्ये सहा वर्षांपूर्वी करार होऊन शांतता प्रस्थापित झाली होती. यानुसार इडलिब प्रांतामध्ये सरकारी सैन्याने घुसू नये असे ठरल्याने बंडखोरांचे वर्चस्व कायम राहिले होते.
गुरुवारी रात्री बंडखोरांनी अलेप्पो भागातील १५ गावांवर हल्ला करत त्यांच्यावर नियंत्रण मिळविले. तसेच, सरकारी सैन्यातील अनेक सैनिकांना ओलिस ठेवले. या बंडखोरांनी काही लष्करी तळांचाही ताबा मिळविला आहे.
त्यानंतर या बंडखोरांनी आज सकाळीही हल्ले करत काही महामार्गांवरही ताबा मिळविला. सीरिया सरकारकडून नागरिकांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या आणि बंडखोरांवरील बाँब हल्ल्याच्या निषेधार्थ हल्ले केल्याचा दावा बंडखोरांनी केला.
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सीरिया सरकारने जोरदार हवाई हल्ले केले. तसेच, रणगाड्यांचा वापर करून महामार्गांवर पुन्हा वर्चस्व मिळविले. हवाई हल्ला करण्यासाठी रशियाच्या लढाऊ विमानांचा वापर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारत-सिरीया यांच्यात द्विपक्षीय चर्चा
भारत आणि सीरिया यांच्यात शुक्रवारी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा मिळाली आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे सरकार पाडण्याचे पाश्चात्य देशांचे कारस्थान तीव्र होत असताना, भारताने आपली मुत्सद्दीगिरी केवळ शब्दांपुरती नसून संबंधांना खोलवर नेऊन दाखविण्यासाठी मैत्रीचा आणि सहकार्याचा हात पुढे केला आहे.
दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांच्या प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. भारतीय बाजूचे नेतृत्व पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका विभागाचे संयुक्त सचिव डॉ. सुरेश कुमार यांनी केले आणि सीरियाच्या बाजूचे नेतृत्व परराष्ट्र व्यवहार उपमंत्री आयमन राद यांनी केले.
भारताचा संदेश
जगाचा एक मोठा भाग सीरियाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत असताना भारताने प्रत्येक परिस्थितीत आपल्या भागीदारांसोबत उभा असल्याचा संदेश दिला आहे. नवी दिल्लीतील या संभाषणामुळे भारत-सीरिया संबंध केवळ मजबूत होणार नाहीत, तर पश्चिम आशियातील भारताची भूमिका आणखी मजबूत होईल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter