जगातील सर्वात प्रसिद्ध इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी टेस्लाने आपली रोबोटॅक्सी सादर केली आहे. या कारची लोक आतुरतेने वाट पाहत होते. टेस्लाने आपल्या रोबोटॅक्सीचे नाव 'सायबरकॅब' ठेवले आहे. ही कार सादर करण्यामागे कंपनीचे नेमकं काय उद्देश आहे, याबद्दलही कंपनीने माहिती दिली आहे. वाहतूक क्षेत्र पूर्णपणे ड्रायव्हरलेस बनवणं हे कंपनीचे उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.
कॅलिफोर्नियामध्ये आयोजित रोबो इव्हेंट टेस्लाने रोबोटॅक्सी सादर केली. या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग इलॉन मस्क यांच्या सोशल मीडिया वेबसाईट एक्सवर करण्यात आले.
इलॉन मस्क यांनी या इव्हेंटमध्ये सांगितले की, त्यांचा रोबोटॅक्सीच्या ट्रान्सफॉर्मेशन पावरवर पूर्ण विश्वास आहे. इलॉन मस्क यांनी नुकताच रोबोटॅक्सीचा प्रोटोटाइप जगासमोर सादर केला आहे, तर याचे उत्पादन २०२६ मध्ये सुरू केले जाऊ शकते.
किती असू शकते किंमत?
इलॉन मस्क यांच्या या रोबोटॅक्सीची किंमत सुमारे ३० हजार डॉलर्स असू शकते, जी भारतीय चलनात सुमारे २५ लाख रुपये इतकी आहे. तसं पाहिलं तर भारतीय बाजारपेठेत यापेक्षाही जास्त किमतीची वाहने आहेत, जी लोकांना खरेदी करायला आवडतात.
यातच टोयोटा फॉर्च्युनर ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय कार आहे. फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत ३३.४३ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ५१.४४ लाख रुपयांपर्यंत जाते. ही ७-सीटर एसयूव्ही आहे. या कारचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.