पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात दहशतवादी आणि सैनिकांत जोरदार संघर्ष सुरू असून काल दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली. यावेळी सैनिकांनी सतरा दहशतवाद्यांना ठार केले. त्याचवेळी कराची विमानतळावरील हल्ल्याप्रकरणी सिंध सरकारने दोन संशयितांच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. या संशयितांनी गेल्या महिन्यांत कराची विमानतळाजवळ एका चिनी नागरिकांच्या गटावर आत्मघाती हल्ला करण्यासाठी मदत केली होती.
खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात काल दोन ठिकाणी राबविलेल्या मोहिमेत १७ दहशतवादी मारले गेले. गुप्तचर माहितीच्या आधारावर सुरक्षा दलाने ऑपरेशन बत्रू आणि उत्तर वझारिस्तान जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात अभियान उघडले. या दोन्ही अभियानानुसार सैनिकांनी दहशतवाद्यांचे ठिकाणं शोधून काढली. बनू जिल्ह्यातील बाका खेल भागात हाफिज गुलबहादूर गटाशी संबंधित १२ दहशतवाद्यांवर सैनिकांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला. दुसरी मोहीम उत्तर वझारिस्तानात मीर अलीच्या हासो खेल भागात राबविण्यात आली. यात पाच दहशतवादी मारले गेले. या वेळी दहशतवाद्यांकडून आणि घटनास्थळापासून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. सुरक्षा दलाने ठार झालेल्या दहशतवाद्यांची छायाचित्रे देखील जारी केले आहेत.
'जेआयटी' नियुक्त
पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या अधिकाऱ्यांनी दोन संशयिताच्या चौकशीसाठी संयुक्त चौकशी समिती (जेआयटी) नियुक्त केली आहे. या दोन संशयितांनी गेल्या महिन्यांत ऑक्टोबर महिन्यांत कराची विमानतळाजवळ एका चिनी ताफ्यावर आत्मघाती हल्ल्यासाठी मदत केली होती. ६ ऑक्टोबर रोजी या आत्मघाती हल्ल्यात चीनच्या दोन अभियंत्यांची आणि एका पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाकिस्तान आणि चीनच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या घटनेनंतर तीन दिवसांनंतर 'बीएलए'च्या नेते आणि अन्य लोकांविरुद्ध 'एफआयआर' दाखल केला.
पाक नागरिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश
पाकिस्तानचा एक नागरिक चुकून भारतीय हद्दीत आल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी रात्रीच त्या नागरिकाला पाकिस्तानच्या रेंजर्सच्या हवाली केले. या निर्णयाने पाकिस्तान रेंजर्सने बीएसएफचे आभार मानले आहेत. प्राथमिक तपासात तो चुकून भारतात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाकिस्तान रेंजर्सशी संपर्क करण्यात आला. नियमानुसार व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर त्याला परत पाठविण्यात आले.