पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबान यांच्यात सीमारेषेवर सुरू झालेल्या संघर्षात आज तालिबान्यांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचा एक सैनिक मारला गेला, तर ११ जण जखमी झाले. तालिबान्यांनी सीमा भागातील एक तपास नाक्यावर हल्ला केला होता.
पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी तेहरीके तालिबान हा दहशतवादी संघटनेच्या अफगाणिस्तानमधील तळांवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणूनच पाकिस्तानवर हल्ले सुरू केल्याचा दावा तालिबान्यांनी केला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान्यांनी शविवारी सकाळपासून सीमा रेषेवरील अनेक ठाण्यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात काही सैनिकांचा मृत्यू झाला, तर सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सात ते आठ दहशतवादी मारले गेले. आजही तालिबान्यांचे हल्ले सुरूच होते. आज विविध तपास नाक्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक सैनिक मारला गेला.
तालिबान्यांकडे अमेरिकी बनावटीची शस्त्रे असल्याचा दावा पाकिस्तानी सैनिकांनी केला आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपले सैनिक माघारी घेतल्यानंतर त्यांचा मोठा शस्त्रसाठा मागे राहिला होता.