सीरियामध्ये असाद सरकार गेल्यानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या देशाच्या भवितव्याबाबत चर्चा करण्यासाठी जॉर्डनमध्ये विविध देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. सर्व देशांनी आपापसांतील मतभेद विसरून सीरियातील राजकीय स्थित्यंतराला सर्वांनी पाठबळ द्यावे, असे संयुक्त निवेदन बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आले.
सीरियामध्ये काही दिवसांपूर्वी बंडखोरांनी असाद सरकार उलथवून टाकत देशाची सूत्रे स्वत:च्या हाती घेतली आहेत. बाशर अल असाद हे परागंदा झाले आहेत. यामुळे देशात राजकीय अस्थिरतेचे वातावरण असून नव्या सरकारला जागतिक पातळीवर मान्यताही मिळालेली नाही.
आज अरब देश, अमेरिका, तुर्किये आणि युरोपीय महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात सीरियाच्या प्रश्नावर चर्चा झाली. या बैठकीनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत भूमिका स्पष्ट करण्यात आली. सीरियामध्ये कट्टरतावादी गटांना बळ मिळू नये आणि देशातील जनतेच्या सुरक्षेला हानी पोहोचू नये, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
देशातील रासायनिक अस्त्रे नष्ट करण्यासही प्राधान्य देण्याचे आवाहन बंडखोर गटांना करण्यात आले आहे. या देशाची एकात्मता कायम राहण्यासाठी स्थानिकांच्या पाठबळावर सत्ता हातात घेतलेल्या बंडखोरांना सर्व देशांनी पाठबळ देण्याचेही आवाहन करण्यात आले. अरब देशांनी स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करताना सीरियाची राज्यघटना बदलण्याचे आवाहन केले. या निवेदनाद्वारे अरब देशांनी इस्राईलने गोलन टेकडी भागात केलेल्या घुसखोरीचाही निषेध करण्यात आला.
हिज्बुल्ला अडचणीत
बैरूत : लेबनॉनमधील हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेला सीरियातील असाद सरकारकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रपुरवठा होत होता. या सरकारची गच्छंती झाल्यानंतर शस्त्रांचा ओघच आटल्याचे हिज्बुल्लाने कबूल केले आहे.
मात्र, शस्त्रे मिळविण्यासाठी दुसरा मार्ग निश्चित शोधू असेही या संघटनेने म्हटले आहे. हिज्बुल्लाकडूनही असाद यांना प्रचंड मदत झाली आहे. असाद यांचे सरकार टिकविण्यासाठी आणि त्यांच्याविरोधातील बंडखोरांचा पाडाव करण्यासाठी हिज्बुल्लाने मागील दशकभरात हजारो दहशतवादी सीरियात पाठविले होते. त्याबदल्यात हिज्बुल्लाला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा होत होता.