गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले अमेरिकेचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अखेर पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना आणण्यासाठी स्पेसएक्सची क्रू-१० मोहीम यशस्वीपणे अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पोहोचली आहे. ही मोहीम शुक्रवारी रात्री फ्लोरिडातील नासाच्या केनेडी अंतराळ केंद्रातून सुरू झाली आणि रविवारी पहाटे अंतराळ स्थानकावर पोहोचली आहे.
क्रू-१० वरील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात काही वेळ संशोधन करतील. विल्यम्स व विल्मोर यांनी केलेले संशोधन व माहिती ताब्यात घेतील. त्यानंतर १९ मार्चला विल्यम्स व विल्मोर या दोघांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करतील. शुक्रवारी (दि. १४) क्रू-१० ने फाल्कन-९ रॉकेटच्या माध्यमातून उड्डाण केले होते. १९ तारखेला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र सोडल्यानंतर २१ ते २३ मार्चच्या दरम्यान सहा अंतराळवीर पृथ्वीवर परततील.
ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे नासाचे कमांडर अॅनी मॅक्क्लेन, पायलट आयर्स, जपानी अंतराळ संशोधन संस्थेतील अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रशियाचे अंतराळवीर कोस्मोनॉट आयएसएसमध्ये दाखल झाले आहेत. परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर त्यांचं अंतराळयान अंटलांटिक महासागरात उतरवले जाऊ शकते.
पृथ्वीवर परतल्यावर नवी आव्हाने
अंतराळात नऊ महिने घालवणे म्हणजे काही सोपे काम नाही. तिथे गुरुत्वाकर्षण नसते, म्हणजे शरीराला पृथ्वीवरच्यासारखी मेहनत करावी लागत नाही. त्यामुळे हाडे कमकुवत होतात, स्नायू आखडतात आणि डोळ्यांवरही परिणाम होतो. सुनीता आणि बुच यांना आता पृथ्वीवर परतल्यानंतर या सगळ्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांची तपासणी करेल आणि त्यांना पुन्हा चालायला, उभं राहायला शिकवेल.