बांगलादेशातील सतखीरा जिल्ह्यातील जशोरेश्वरी काली मातेच्या मंदिरातून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत खास बाब म्हणजे, चोरी झालेला मुकुट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ साली बांगलादेश दौऱ्यात भेट दिलेला होता. मुकुट हा चांदीचा असून त्यावर सोनेरी कोटिंग करण्यात आले होते. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा बांगलादेशात हिंदू समुदायावर दुर्गा उत्सवाच्या काळात धमक्या येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
मंदिराच्या पुजाऱ्याने घटनेची माहिती दिली
गुरुवारी दुपारी ही चोरी झाल्याचे सांगितले जात आहे. मंदिराचे पुजारी नियमित पूजा संपवून मंदिरातून बाहेर पडले होते. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्याने देवीच्या मूर्तीवरील मुकुट गायब असल्याचे पाहिले. जशोरेश्वरी काली मंदिर हे शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या चोरीमुळे धार्मिक समुदायामध्ये संताप व्यक्त होत आहे.
मंदिराची ऐतिहासिक माहिती
सतखीरा जिल्ह्यातील ईश्वरीपुर येथे असलेले हे मंदिर १२व्या शतकात ब्राह्मण अनारी यांनी बांधले होते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात १०० दरवाजे होते. १३व्या शतकात लक्ष्मण सेन यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. १६व्या शतकात राजा प्रतापादित्य यांनी मंदिराचा पुनर्निर्माण केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
मार्च २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान जशोरेश्वरी मंदिराला भेट दिली होती. त्यांनी या मंदिरात चांदीचा मुकुट भेट म्हणून दिला होता, ज्यावर सोनेरी कोटिंग करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान मोदी यांनी जशोरेश्वरी मंदिराच्या आवारात एक समाजिक भवन बांधण्याची घोषणा केली होती, ज्याचा उपयोग धार्मिक, शैक्षणिक आणि आपत्तीच्या वेळी आश्रय म्हणून होईल, असे त्यांनी सांगितले होते.