लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकीटॉकीत स्फोटांची मालिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

लेबनॉनमध्ये बुधवारी झालेल्या स्फोटात किमान १४ जण ठार झाले आणि ४५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिजबुल्लाह या सशस्त्र गटाच्या सदस्यांनी वापरलेल्या वॉकी-टॉकी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटाची घटना कालच्या पेजर स्फोटानंतरचीच असून, यामुळे लेबनॉनमधील तणाव आणखीनच वाढला आहे.

राजधानी बेरूत आणि दक्षिणेकडील भागात स्फोटाची माहिती
लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात आणि राजधानी बेरूतच्या उपनगरात या स्फोटांचे वृत्त आहे. महदी अम्मार यांच्या अंत्ययात्रेदरम्यान एक स्फोट झाला. महदी हे लेबनॉनचे खासदार अली अम्मार यांचे पुत्र होते. तसेच, सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओंमध्ये वाहनांमध्ये स्फोट झाल्याचेही दिसत आहे, हे स्फोट वॉकी-टॉकीच्या स्फोटामुळे घडल्याचे मानले जात आहे.

सौर ऊर्जेच्या यंत्रणांमध्येही स्फोट
लेबनॉनच्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार, बेरूतच्या काही भागांमध्ये घरगुती सौर ऊर्जा यंत्रणांमध्येही स्फोट झाले आहेत. विशेष म्हणजे, हिजबुल्लाहने त्याच्या सदस्यांना मोबाइल फोन वापरणे टाळण्याचे निर्देश दिले होते. गेल्या वर्षी गाझाच्या युद्धानंतर या गटाने त्यांच्या स्वतःच्या दूरसंचार यंत्रणेवर अवलंबून राहण्यास सुरुवात केली होती, ज्यामुळे च इस्राईलच्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळू शकेल, अशी त्यांची योजना होती.

इस्राईलचा हात असल्याचा हिजबुल्लाहचा आरोप
लेबनॉनच्या अंतर्गत सुरक्षा दलांनी सांगितले की, देशभरात, विशेषत: बेरूतच्या दक्षिणेकडील भागात वायरलेस संप्रेषण उपकरणांचे स्फोट झाले आहेत. हा भाग हिजबुल्लाहचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हिजबुल्लाहच्या नेतृत्वाने या घटनेला इस्रायलचा ‘दुराचारी हस्तक्षेप’ असल्याचा आरोप केला आहे.

हिजबुल्लाहचा आरोप आणि इस्राईलचे प्रत्युत्तर
हिजबुल्लाहने यापूर्वीच इस्राईलच्या तोफखान्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. पेजर स्फोटाच्या प्रतिक्रियेत बुधवारी त्यांनी हे हल्ले केले असल्याचे सांगितले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाहने सुमारे पाच महिने पूर्वी हे वॉकी-टॉकीज खरेदी केले होते, त्याच वेळी त्यांनी पेजर उपकरणेही खरेदी केली होती. इस्राईलच्या गुप्तहेर यंत्रणा मोसादने या पेजरमध्ये स्फोटकं लावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. लेबनॉनमधील या स्फोटांनी इस्रायल-हिजबुल्लाह तणाव अधिक वाढला असून, भविष्यात या दोन्ही गटांमध्ये मोठ्या युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter