भारताचे प्रतिनिधी आनंद प्रकाश आणि तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यात काबुलमध्ये पार पडलेली बैठक
अफगानिस्तानात सत्तापालटानंतर तालिबान सरकार सत्तेवर आहे. देशात गुंतवणूक वाढवण्यासाठी तालिबान सरकार जागतिक नेत्यांच्या भेटी घेत आहे. याच दरम्यान भारताचे प्रतिनिधी आनंद प्रकाश यांनी काबुलमध्ये तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांची भेट घेतली.
या भेटीत राजकीय आणि व्यापारी मुद्द्यांवर चर्चा झाली. अफगानिस्तानने भारतीय व्यापाऱ्यांना गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात सहज ये-जा करता यावी, अशी मागणीही झाली. व्यापारी, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना व्हिसा सहज मिळावा, असेही सांगण्यात आले. या बैठकीत मुत्ताकी यांनी भारतासोबत राजकीय आणि आर्थिक संबंध दृढ करण्यावर भर दिला.
ही भेट का महत्त्वाची?
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना ही भेट झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तालिबान सरकारने निषेध केला होता. भारतासोबत राहण्याची तयारीही त्यांनी दाखवली. त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भारताने तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही
भारताने अद्याप अफगानिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. अफगानिस्तानात सर्वसमावेशक सरकार स्थापन व्हावे, अशी भारताची भूमिका आहे. अफगानिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाऊ नये, यावर भारत ठाम आहे. जून २०२२ मध्ये भारताने काबुलमधील दूतावासात 'तांत्रिक पथक' तैनात करून राजनायिक उपस्थिती पुन्हा प्रस्थापित केली होती.