दहशतवाद आणि फुटीरतावाद यांच्याशी लढण्याला SCO चे प्राधान्य - परराष्ट्रमंत्री जयशंकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
परराष्ट्रमंत्री जयशंकर
परराष्ट्रमंत्री जयशंकर

 

जागतिक स्तरावर आज सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद आहे.  शांघाई सहयोग संघटनेने (एससीओ) या क्षेत्राच्या सुरक्षेत प्रमुख भूमिका बजावली पाहिजे, असे मत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केले. कझाकिस्तानच्या अस्ताना येथील कझइंफॉर्म न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. दहशतवाद, अलगाववाद आणि अतिरेकी या तीन प्रमुख शत्रूंशी लढण्याची एससीओची प्राथमिकता आहे, असे त्यांनी सांगितले.

"दहशतवाद हा आज जगासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो क्षेत्रीय आणि जागतिक शांततेसाठी धोका बनला आहे आणि त्यासाठी सर्वांकडून तात्कालिक कृतीची गरज आहे. कझाकिस्तानने त्यांच्या अध्यक्षतेखाली दहशतवाद, अलगाववाद आणि अतिरेकवाद यांचा मुकाबला करण्यासाठी कृतीकार्यक्रम तयार केला आहे.  शिखरसंमेलनात तो  स्वीकृत करण्यात आला याचा मला आनंद आहे.", असे ते म्हणाले.

भारताच्या गेल्या वर्षीच्या एससीओच्या अध्यक्षतेदरम्यान या विषयावर संयुक्त निवेदन देण्यात आल्याचे असेही त्यांनी सांगितले. कझाकिस्ताननेही त्या संयुक्त निवेदनाची परंपरा जपली आहे, असे सांगत जयशंकर यांनी या निवेदनांच्या अंमलबजावणीवरही भर दिला.

"गेल्या वर्षी नवी दिल्ली शिखर संमेलनात स्वीकृत करण्यात आलेल्या दोन संयुक्त निवेदनांपैकी एक 'दहशतवाद, अलगाववाद आणि अतिरेकवाद होण्यास कारणीभूत असलेल्याचा मुकाबला' यावर होती. या निवेदनांमध्ये अतिरेकीकरणाचे विविध घटक समाविष्ट होते - ज्यात विचारधारा, माध्यमांच्या मोहिमा, तसेच इंटरनेटवरवरील अतिरेकी आणि दहशतवादी सामग्री यांचा समावेश आहे", असे परराष्ट्र मंत्री म्हणाले.

"कझाकिस्तानने त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्या संयुक्त निवेदनाची परंपरा पुढे नेली. दहशतवाद, अलगाववाद आणि अतिरेकीवाद यांचा मुकाबला करण्यासाठी आधुनिक कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा आहे. परंतु आता याची अंमलबजावणी अधिक महत्वाची आहे.  सीमापार दहशतवादांसह सर्व स्वरूपातील दहशतवादाच्या आव्हानांना हटवण्यासाठी सर्व सदस्य राष्ट्रांकडून स्पष्ट प्रतिबद्धता अपेक्षित आहे.", असे त्यांनी पुढे नमूद केले.

जयशंकर यांनी कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली अस्ताना येथे झालेल्या एससीओच्या राज्य प्रमुख परिषद (एससीओ शिखरसंमेलन) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.