रशियाचा युक्रेनवर सर्वांत मोठा ड्रोन हल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

किव्ह : रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून सर्वांत मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी किव्ह स्थापना दिन साजरा करण्याची तयारी करत असतानाचा रशियाने हा हल्ला केला. या हल्ल्यात एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे.

 

शनिवारी (ता.२७) रात्री रशियाने इराणी बनावटीच्या शाहेद ड्रोनसह किव्हवर हा मोठा हल्ला केला, अशी माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याने दिली. सुमारे पाच तास सुरू असलेल्या या हल्ल्यात ४० पेक्षा अधिक ड्रोनचा वापर करण्यात आला.

 

या हल्ल्यामुळे सातमजली इमारत कोसळून एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान, रशियाने सोडलेल्या ५४ ड्रोनपैकी ५२ ड्रोन हवेतच निकामी केल्याचा दावा युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने केला.

 

युक्रेनच्या ईशान्येकडील खारकिव्ह प्रांतात तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते यात प्रत्येकी एका महिला व पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, युक्रेनचा इतिहास असुरक्षित रशियनांना प्रदीर्घ काळ त्रस्त करणारा आहे.

 

असा संदेश युक्रेनच्या अध्यक्षांचे सहाय्यक ॲंड्री येर्माक यांनी ‘टेलिग्राम’द्वारे दिला. रशियाने युक्रेनविरुद्ध फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू केल्यापासून सीमावर्ती प्रदेशांत ड्रोन हल्ले ही नित्याची बाब झाली असून गेल्या महिन्यापासून या हल्ल्यांत वाढ झाली आहे. या ताज्या हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

किव्ह जाणीवपूर्वक लक्ष्य

युक्रेनच्या राजधानीत दरवर्षी आतषबाजी, मैफली, प्रदर्शने आदींच्या माध्यमातून स्थापनादिन उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. रशियाचा हल्ला म्हणजे केवळ योगायोग नसून स्थापनानिमित्त रशियाने युक्रेनच्या राजधानीला जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा दावा युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याने केला.