युक्रेनमध्ये नागरिक नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत असतानाच रशियाने आज युक्रेनची राजधानी किव्ह आणि इतर अनेक शहरांवर जोरदार क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, युक्रेनवर दबाव कायम ठेवण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
राजधानी किव्हवर आज पहाटे तीन वाजता दोन क्षेपणास्त्रांचा मारा झाला. त्यानंतर सकाळी आठ वाजताही हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये किमान बारा इमारतींचे नुकसान झाले. अशाच प्रकारचे हल्ले शोस्तका, खारकिव्ह आणि इतर काही शहरांमध्येही झाले. या माऱ्यात काही शैक्षणिक संस्थांचे नुकसान झाले, तसेच काही पूलही पडले. रशियाने नाताळच्या दिवशीही युक्रेनमध्ये सर्वत्र हल्ले केले होते. अमेरिका आणि युरोपने युक्रेनला हवाई संरक्षण यंत्रणा पुरविली आहे. मात्र, रशिया एकाच वेळी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत या संरक्षण यंत्रणेला शह देत असल्याचे दिसून आले आहे.
रशिया-युक्रेनमधील युद्धाला पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. या कालावधीत युक्रेनमध्ये प्रचंड प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यांनी दिले आहे.
नागरिकांना थंडीची भीती
युक्रेनमध्ये प्रचंड थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत देशातील निम्मी ऊर्जाकेंद्रे नष्ट झाली आहेत. त्यामुळे घरांमध्ये उष्णता कायम ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विजेचा तुटवडा बहुतांश नागरिकांना जाणवत आहे. देशातील उर्वरित ऊर्जाकेंद्रांनाही रशिया लक्ष्य करत असल्याने कडाक्याची थंडी सहन करण्याशिवाय अनेक नागरिकांना पर्याय राहिलेला नाही.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter