अमेरिकेच्या भूमिकेनंतर रशिया आक्रमक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 23 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

रशियावर कोणत्याही देशाने पारंपरिक पद्धतीने हल्ला केल्यास आणि हल्ला करणाऱ्या देशाला अण्वस्त्रे असलेल्या दुसऱ्या देशाने पाठबळ दिल्यास हा रशियावर झालेला संयुक्त हल्ला असल्याचे समजले जाईल, असे निश्चित करणाऱ्या ठरावावर रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी आज स्वाक्षरी केली. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आज एक हजार दिवस पूर्ण होत असल्याच्या दिवशीच पुतीन यांनी हा इशारा दिला आहे.

२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसविले होते. त्यानंतर मागील पावणे तीन वर्षांत रशियाने युक्रेनच्या पूर्व आणि उत्तर भागात अविरत बाँब हल्ले करत काही भाग ताब्यातही घेतला आहे. रशियाने युक्रेनमध्ये सर्वत्र केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनचे अतोनात नुकसान झाले असून प्रचंड प्रमाणात जीवितहानीही झाली आहे. युक्रेनला युरोप आणि अमेरिकेचा सक्रिय पाठिंबा असून कालच (ता. १८) अमेरिकेने युक्रेनला दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची परवानगी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी आपले नवे धोरण जाहीर केले आहे. यानुसार, अण्वस्त्रक्षम नसलेल्या कोणत्याही देशाने रशियावर पारंपरिक पद्धतीने हल्ला केला आणि या हल्ल्याला इतर अण्वस्त्रक्षम देशाचे पाठबळ असल्यास हा रशियावरील संयुक्त हल्ला समजला जाईल, असे रशियाने स्पष्ट केले आहे. पुतीन यांनी काही महिन्यांपूर्वीच या धोरणाचे सूतोवाच केले होते. हे धोरण म्हणजे युक्रेनला मदत करणाऱ्या युरोप आणि अमेरिकेला इशारा असल्याचे समजले जाते.

युक्रेनने आज रशियावर अमेरिकेने दिलेली दीर्घपल्ल्याची मारकक्षमता असलेली सहा क्षेपणास्त्रे डागल्याने तणाव आणखी वाढला आहे. मध्यंतरी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीच युक्रेनला या क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची परवानगी दिली होती. रशियाच्या ब्रायन्स्क भागामध्ये खोलवर युक्रेनकडून क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. युद्धाला आज एक हजार दिवस पूर्ण झाले असून त्या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून ही कारवाई करण्यात आल्याने युद्धाची धग आणखी वाढू शकते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter