"जागतिक महासत्ता असलेल्या देशांच्या यादीत स्थान प्राप्त करण्यास भारत पूर्णपणे पात्र आहे, या देशाची अर्थव्यवस्था जगातील इतर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत वेगाने वाढत आहे," असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी आज केले. भारताबरोबर आम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगले संबंध निर्माण करत असून आमच्या संबंधांमध्ये अत्यंत विश्वासाचे वातावरण आहे, असेही पुतीन म्हणाले.
सोची येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना पुतीन यांनी भारताचे कौतुक केले. पुतीन म्हणाले, "भारत ही एक प्राचीन संस्कृती असून या देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी यादीमध्ये भारताचे नाव समाविष्ट करणे आवश्यक आहे. दीड अब्जांच्या आसपास लोकसंख्या असलेला हा देश महान आहे. जागतिक अर्थव्यवस्था वाढीत भारत सध्या आघाडीवर आहे." भारत आणि रशियामध्ये चांगले संबंध असून हे संबंध कोणत्या दिशेला आणि किती वेगाने पुढे न्यायचे हे वास्तव परिस्थितीवर अवलंबून असते आणि त्यामुळेच आमच्या सहकार्य क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे, असेही पुतीन यांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्रातही मैत्री
भारत आणि रशियामध्ये संरक्षण आणि लष्करी क्षेत्रांत चांगले संबंध निर्माण होत असल्याचे पुतीन यांनी सांगितले. ते म्हणाले, "भारतीय लष्कराकडे रशियन बनावटीची अनेक शस्त्रे आहेत. आमच्यात पूर्ण विश्वासाचे वातावरण आहे. आम्ही फक्त भारताला शस्त्रांची फक्त विक्रीच करतो असे नाही, तर आम्ही संयुक्तपणे त्या शस्त्रांची त्वनाही करतो." हे सांगताना पुतीन यांनी 'ब्राह्मोस' क्षेपणास्त्राचे उवाहरण दिले.
'चतुर माणसे भविष्याकडे पाहतात'
भारत आणि चीन यांच्यात सीमाप्रश्नी वाद असल्याची नोंदही पुतीन यांनी घेतली. मात्र, चतुर व क्षमतावान माणसे आपल्या देशाच्या भविष्याकडे कायम लक्ष ठेवतात आणि तोडगा शोधण्याचा कायम प्रयत्न करत राहतात व त्यांना असा तोडगा सापडतोही', अशी टिप्पणीही त्यांनी केली.