हिंसाग्रस्त बांगलादेशातून शेकडो भारतीय विद्यार्थ्यांची सुटका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलन चिघळल्यामुळे आतापर्यंत ९९८ भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना भारतात सुरक्षित आणले आहे. बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलनाचे लोण विविध विद्यापीठांमध्ये तसेच प्रमुख शहरांतील रस्त्यांवर पसरल्यामुळे आतापर्यंत किमान ११५ जण मृत्यमुखी पडले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताचे परराष्ट्र मंत्रालय नागरी विमान वहातूक मंत्रालय, इमिग्रेशन, लँड पोर्टस् आणि सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून भारतीय नागरिकांना भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षित पोचवत आहे. भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधात भारतीय उच्चायुक्त बांगलादेशच्या अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात आहे.

आतापर्यंत वेगवेगळ्या रस्त्यांनी ७७८ भारतीय विद्यार्थी भारतात सुरक्षित पोचले असून ढाका आणि चितगाव विमानतळांवरील नियमित विमानसेवांद्वारे सुमारे दोनशे भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. या दोन्ही शहरांतून भारतात परतण्यासाठी विमानसेवा व्यत्ययाविना सुरु राहावी, म्हणून बांगलादेशच्या नागरी विमान वहातूकअधिकारी आणि व्यावसायिक एअरलाईन्सशी समन्वय साधण्यात येत आहे.

बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये शिकत असलेल्या चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी ढाक्यातील उच्चायुक्तालय तसेच चितगावच्या सहायक उच्चायुक्तलयाने नियमित संपर्क ठेवला असून त्यांना आवश्यक साह्य दिले जात आहे. नेपाळ आणि भूतानच्या विद्यार्थ्यांच्या विनंतीवरुन त्यांना भारतात दाखल होण्यास मदत केली जात आहे. ढाक्यातील सहायक उच्चायुक्तालयांकडून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून भारतीय नागरिकांना मदत करण्यात येत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter