सीरियामध्ये बंडखोर सशस्त्र गटांची आक्रमकता वाढली असून बंडखोरांनी देशातील सर्वांत मोठे शहर असलेल्या अलेप्पोवर ताबा मिळविला आहे. तसेच, येथील विमानतळही बंडखोरांच्या ताब्यात आले आहे.
या शहराचा ताबा मिळविताना बंडखोरांना सरकारच्या नियंत्रणाखालील सैन्य दलांकडून अत्यल्प विरोध झाला. याशिवाय बंडखोरांनी हामा प्रांताच्या उत्तर भागातही प्रवेश केला आहे. हयात ताहरीर अल शम या सुन्नी पंथियांचे वर्चस्व असलेल्या सशस्त्र गटाच्या नेतृत्वाखाली बंडखोर सरकारी फौजांवर हल्ले करत आहेत.
अनेकवेळा इशारा देऊनही सरकारी फौजा अकारण बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशांमध्ये बाँबफेक करत असल्यानेच हल्ले सुरू केल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून बंडखोरांनी सीरियाच्या उत्तर भागावर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली आहे.
शनिवारी रात्री अलेप्पो आणि येथील विमानतळावर ताबा मिळविल्यानंतर हजारो बंडखोर हामा प्रांतातील गावेच्या गावे ताब्यात घेत आहेत. हा भाग २०१६ पर्यंत बंडखोरांच्याच ताब्यात होता. मात्र, २०१६ मध्ये सैन्याने त्यांना येथून हुसकावून लावले होते. या संघर्षातील मृतांची अधिकृत संख्या जाहीर झालेली नाही. मात्र, मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार मागील पाच दिवसांत किमान ५० जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रतिहल्ल्याची तयारी सुरू
बंडखोरांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सीरियाच्या सैन्यानेही तयारी सुरू केली आहे. बंडखोरांनी अलेप्पो आणि इतर शहरांवर ताबा मिळविला असला तरी अद्याप तेथे आपले तळ किंवा तपासनाके सुरू केलेले नाहीत. त्यामुळे लवकरच मोठ्या सैन्यानिशी प्रतिहल्ला करत बंडखोरांना हुसकावून लावले जाईल, असा विश्वास सीरियाच्या सरकारने व्यक्त केला आहे.
मित्रदेशांच्या मर्यादा
सीरियामध्ये बाशर अल असाद हे अध्यक्षपदावर असून त्यांना सीरिया आणि इराणचा पाठिंबा आहे. मागील दशकभरापासून सीरियाच्या सैन्याची बंडखोरांविरोधात लढाई सुरू आहे. मात्र, मागील आठवड्यात बंडखोरांनी अचानक मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू केल्याने असाद सरकारच्या कमतरता उघड पडल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यांची अनेक महिन्यांपासून तयारी सुरू असल्याचे मानले जात आहे. असाद यांना पाठिंबा देणारे इराण आणि रशिया हे देश त्यांच्या स्वत:च्या युद्धांमध्ये गुंतले असल्याची संधी साधतच बंडखोरांनी हल्ले सुरू केल्याचे मानले जात आहे.