रमजान देतो सहिष्णुतेचा आणि शांततेचा संदेश - UN महासचिव गुटेरेस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस मुस्लिमांशी संवाद साधताना
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस मुस्लिमांशी संवाद साधताना

 

न्यूयॉर्क, ३ मार्च

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी रमजानच्या शुभमुहूर्तावर एक व्हिडिओ संदेश जारी करत जागतिक समुदायाला शांती, सहिष्णुता आणि न्यायासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी या पवित्र काळात शांतता, न्याय आणि सहिष्णुतेच्या महत्वावर भर दिला.

गुटेरेस यांनी आपल्या संदेशात म्हटले की, "रमजान हा आत्मसंयम, परोपकार आणि सामूहिक ऐक्य साजरा करण्याचा काळ आहे. या महिन्यात आपण परस्पर सहिष्णुता आणि मानवतेच्या मूल्यांना अधिक दृढ करावे. या काळात आपल्याला गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्याची आणि शांततेचा मार्ग स्वीकारण्याची संधी मिळते."

रमजान – शांती आणि सहिष्णुतेचा महिना
गुटेरेस यांनी आपल्या संदेशात रमजानच्या मूलभूत तत्त्वांवरही प्रकाश टाकला. "रमजान आपल्याला परोपकार, करुणा आणि सहिष्णुतेची शिकवण देतो. हा महिना केवळ उपवासाचा नाही, तर आपले अंतःकरण शुद्ध करण्याचा, गरजूंची काळजी घेण्याचा आणि आपल्या समाजाला अधिक समजून घेण्याचा काळ आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

गुटेरेस यांनी सर्व धर्म, संस्कृती आणि समुदायांनी परस्पर सौहार्द आणि सहिष्णुतेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. "शांती आणि सहिष्णुता हीच रमजानची खरी शिकवण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे," असेही ते यावेळी म्हणाले. 

रमजाननिमित्ताने जागतिक समुदायाला आवाहन 
संयुक्त राष्ट्र महासचिवांनी आपल्या संदेशाच्या  सर्वधर्मीयांना संपूर्ण मानवतेसाठी एकजुट होण्याचा संदेश दिला. "रमजानच्या निमित्ताने आपण एकत्र येऊन शांतता, न्याय आणि मानवतेला प्रोत्साहन देऊया," असे आवाहन करत त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सर्वांना परस्पर सहकार्य आणि सामंजस्याने पुढे जाण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. त्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यात शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आणि प्रत्येकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

युद्धग्रस्त आणि पीडितांसाठी विशेष अपील
महासचिव गुटेरेस यांनी विशेषतः संघर्षग्रस्त आणि पीडित समुदायांसाठी संवेदनशीलता दाखवत, युद्ध आणि अन्यायग्रस्त भागांतील लोकांसाठी जगभरातील नेत्यांनी तातडीने शांतीचे पाऊल उचलावे, असे आवाहन केले.

"आपण विसरू नये की, जगभरातील लाखो लोक युद्ध, विस्थापन आणि दारिद्र्याचा सामना करत आहेत. रमजानच्या या पवित्र काळात आपण सहानुभूती आणि मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले.

या पवित्र काळात जगभरातील युद्धग्रस्त आणि अन्यायाने ग्रस्त लोकांसाठी विशेष प्रार्थना करण्याचे त्यांनी आवाहन केले. "आज जगभर संघर्ष, हिंसा आणि असमानतेने ग्रस्त लोकांना आधार देण्याची गरज आहे. रमजानच्या पवित्रतेतून आपण मानवतेसाठी उभे राहायला हवे," असे त्यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रे मानवाधिकार आणि शांतता प्रस्थापनेसाठी कटिबद्ध असून, रमजानच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर अधिक सहकार्य आणि न्यायाच्या मार्गाचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी सर्व राष्ट्रांना प्रोत्साहित केले.

शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे कटीबद्ध
महासचिवांनी संयुक्त राष्ट्र संघाने मानवाधिकार आणि न्यायसंस्थांची मदत करण्यासाठी राबलेल्या विविध उपाययोजनांचा उल्लेख केला. "संयुक्त राष्ट्रे हे जागतिक शांततेचे आणि मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. आपण एकत्रित प्रयत्नांनी जगाला अधिक सुरक्षित आणि न्यायसंगत बनवू शकतो," असे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. गाझा, सुदान यांसारख्या युद्धभूमीवर शांतता प्रस्थापित करणाऱ्यांसोबत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

संयुक्त राष्ट्रे जगभरातील संघर्षग्रस्त भागांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावर भर देताना गुटेरेस म्हणाले, "संयुक्त राष्ट्रे युद्धग्रस्त आणि विस्थापित लोकांसाठी कार्यरत आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे."
 

वार्षिक परंपरा: ऐक्याचा संदेश 

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ऐक्याच्या प्रतीक म्हणून रमजान महिन्यात मुस्लिम समुदायासोबत उपवास करण्याची परंपरा सुरू केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चायुक्त (UNHCR) म्हणून आपल्या दशकभराच्या कार्यकाळात त्यांनी विस्थापित आणि वंचित समुदायांसोबत रमजान साजरा करण्याची प्रथा सुरू केली होती. “प्रत्येक रमजानमध्ये, मी जगभरातील मुस्लिम समुदायाला भेट देतो आणि त्यांच्यासोबत उपवास करतो. या भेटी इस्लामचा खरा संदेश जगासमोर मांडतात,” असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter