रमजान : महान क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने 'असा' दिला धार्मिक सौहार्दाचा संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
महान क्रिकेटपटू सनथ जयसूर्या त्याच्या मुस्लिम मित्रांसोबत इफ्तार करताना.
महान क्रिकेटपटू सनथ जयसूर्या त्याच्या मुस्लिम मित्रांसोबत इफ्तार करताना.

 

श्रीलंकेचा माजी क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सनथ जयसूर्या याने रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा धरत सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला. सनथ जयसूर्या हा बौद्ध धर्माचा अनुयायी आहे. श्रीलंकेचा आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे.  नुकतेच त्याने त्याच्या मुस्लिम मित्रांसोबत एक दिवसाचा रोजा ठेवला आणि त्यानंतर त्यांच्यासोबत इफ्तार केले. रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. इफ्तार हा उपवास सोडण्याचा क्षण असतो. याविषयी त्याने सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली. या अनोख्या कृतीमुळे त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शालेय जीवनापासून रोजा पकडतो
सनथ जयसूर्याने रोजा पकडण्याविषयी सांगितले की, “माझ्या मुस्लिम मित्रांसोबत आज रोजा ठेवल. ही माझी शाळेपासूनची परंपरा आहे.”  शाळेत असताना जयसूर्या मुस्लिम मित्रांसोबत रमजानचा एक दिवसाचा रोजा ठेवायचा आणि इफ्तारमध्ये सहभागी व्हायचा. ही अनोखी परंपरा त्याने आजही जपली आहे. 

श्रीलंकेसारख्या बहुधर्मीय देशात सनथ जयसूर्याची ही कृती विशेष महत्त्वाची ठरते. याठिकाणी भारताप्रमाणेच वेगवेगळ्या धर्मांचे आणि संस्कृतींचे लोक एकत्र राहत राहतात. अशा सामाजिक आणि धार्मिक सौहार्दाच्या कृती समाजाला एकसंध ठेवण्याचे काम करतात. जयसूर्याने आपल्या या कृतीतून हे दाखवून दिले की धर्म कोणताही असला तरी मैत्री आणि परस्परांबद्दलचा आदर महत्वाचा आहे. त्याच्या चाहत्यांनीही या कृतीचे मनापासून स्वागत केले आहे.

एका चाहत्याने लिहिले की, ‘धर्म कोणताही असो सनथ हा खरा मानवतावादी आहे.’ तर आणखी एकाने लिहले की, ‘तुझ्यासारखे खेळाडू समाजासाठी एक चांगला आदर्श निर्माण करत आहेत. आजच्या काळातील धार्मिक आणि सामाजिक तणावाच्या परिस्थितीत सनथ जयसूर्याची सर्वाना अनुकरणीय आहे. त्याच्या या कृतीने सर्वांच्या मनात घर केले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter