बांग्लादेशी आणि रोहिंग्यांवर रेल्वेने केली 'ही' कारवाई

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 6 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

देशाच्या सीमाभागातून परकीय लोक भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही लोक बनावट कागदपत्रांचा वापर करून, तर काही लोक नोकरी किंवा अन्य कारणांसाठी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०२१ पासून आतापर्यंत शेकडो बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांना पकडल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. नुकतेच रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भातील एक परिपत्रक जाहीर केले.

रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) २०२१ पासून आतापर्यंत ५८६ बांगलादेशी नागरिक आणि ३१८ रोहिंग्यांसह ९१६ व्यक्तींना यशस्वीरित्या पकडले आहे. जून आणि जुलै २०२४ मध्ये, RPF ने उत्तर-पूर्व सीमांत रेल्वे (NFR) अंतर्गत येणाऱ्या प्रदेशांमध्ये ८८ बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांना पकडले आहे. यापैकी काही व्यक्तींनी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याची कबुली दिली.

ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार बांगलादेश सीमेजवळ भारताने सुरक्षा वाढवली आहे. तरीही बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. आसाम ट्रान्झिट मार्ग म्हणून आणि इतर भागात जाण्यासाठी घुसखोर रेल्वेचा वापर करतात. घुसखोरांनी रेल्वेचा वापर केल्यामुळे ते इतर राज्यांमध्ये सहज प्रवास करू शकतात. रेल्वेने प्रवास करत असल्यामुळे त्यांना पकडण्याचे आव्हान भारतीय अधिकाऱ्यांसामोर उभे राहते.

रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) तज्ञांकडून असे सांगितले जाते की, रेल्वे नेटवर्क एक मोठे आणि सुसंगत परिवहन साधन आहे. असम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना प्रवेश करत असताना घुसखोर रेल्वेचे वापर जास्त करतात. यामुळे त्यांचा शोध घेत असताना सुरक्षा यंत्रणांना अनेक अडचणी येतात.

या घुसखोरांना पकडण्यासाठी  RPF ने सीमा सुरक्षा दल (BSF), स्थानिक पोलिस आणि गुप्तचर युनिट्स यांसारख्या महत्त्वाच्या सुरक्षा एजन्सींसह काम सुरू केले आहे. RPFच्या या दृष्टिकोनामुळे ऑपरेशनल कार्यक्षमतेत महत्त्वपूर्ण सुधारणा झाली आहे. यामुळे स्थलांतरित होणाऱ्या घुसखोरांना पकडणे शक्य झाले आहे. रेल्वे सुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान देत असतानाही RPFकडे पकडलेल्या व्यक्तींविरुद्ध थेट खटला चालविण्याचा अधिकार नाही. पकडलेल्या व्यक्तींवर पुढील कारवाई करण्यासाठी इतर एजन्सींकडे दिले जाते.

भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी या धोक्याला गंभीरतेने घेतले आहे आणि एकात्मिक कार्यपद्धती अवलंबली आहे. विशेषत: बांगलादेश आणि म्यानमार सारख्या देशांमधील सध्याची राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे. या देशांतील राजकीय घटनाक्रम आणि सामाजिक-धार्मिक कारणांमुळे तेथील नागरिकांचे भारतात घुसखोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. रेल्वेचा वापरकरून घुसखोरी करणाऱ्यांची संख्या किती आहे याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. तरीही रेल्वे सुरक्षा दलाच्या निरंतर प्रयत्नांमुळे, अनेक घुसखोरांना पकडण्यात यश मिळाले आहे. 

रेल्वे सुरक्षा दलाने भारताच्या सीमांत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या घुसखोरांची संख्या वाढत असली तरी, रेल्वे सुरक्षा दल आणि संबंधित एजन्सींचे एकत्रित कार्य हे भारताच्या सुरक्षा आणि स्थैर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter