हमास आणि इस्त्राईल यांच्यातील वादात चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघून संघर्ष थांबावा, यासाठी अनेक महिन्यांपासून मध्यस्थी करणाऱ्या कतारने आता या प्रक्रियेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शस्त्रसंधी करण्याचा दोन्ही बाजूंकडून गांभीर्याने विचार होत नसल्यानेच हताश होऊन माघार घेत असल्याचे कतारने जाहीर केले आहे.
कतारने आज इस्त्राईल आणि हमासला मध्यस्थ म्हणून काम करणार नसल्याचे कळविले आहे. सकारात्मक भावनेने शांतता प्रस्थापित होण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याने या प्रक्रियेतून माघार घेत आहोत, असे कतारने म्हटले आहे.
तसेच, कतारची राजधानी दोहा येथील हमासच्या कार्यालयाकडूनही चर्चेसाठी कोणतीही पाऊले उचलली जात नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. दोन्ही बाजूंकडून गांभीर्याने प्रयत्न सुरू झाल्यास पुन्हा एकदा या प्रक्रियेत सहभागी होऊ, असेही कतारने कळविले आहे.
इस्त्राईल आणि हमास यांच्यातील वादात कतार प्रथमपासूनच सहभागी आहे. कतार व्यतिरिक्त इजिप्त आणि अमेरिका मध्यस्थ म्हणून प्रयत्न करत आहेत. मात्र, हमासचा केवळ कतारवरच विश्वास असल्याने ते कतारच्याच माध्यमातून इतरांशी संवाद साधत असतात. शांतता चर्चेच्या सर्व बैठकाही कतारमध्येच होतात. त्यामुळे आता कतारनेच मध्यस्थ म्हणून प्रयत्न सोडून देण्याचा निर्णय घेतला असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
हल्ल्यात १७ जण ठार
इस्राईलने आज पहाटेच उत्तर गाझा पट्टीमधील एका निर्वासितांच्या छावणीवर जोरदार बाँबफेक केली. यामध्ये किमान १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याने आणि परिसरातील रुग्णालयांमध्ये अत्यंत अपुरी व्यवस्था असल्याने मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज स्थानिक माध्यमांनी व्यक्त केला आहे. गाझा पट्टीच्या उत्तर भागावर ताबा मिळविण्याचा इस्त्राईलचा प्रयत्न असून मागील काही आठवड्यांपासून येथे होणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे.