इराणच्या अध्यक्षपदी पुरोगामी पेजेश्कियान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 12 d ago
 मसूद पेजेश्कियान
मसूद पेजेश्कियान

 

इराणमध्ये गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले होते. यानंतर शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या पदासाठी कट्टरपंथी सईद जलिली आणि सुधारणावादी मसूद पेजेश्कियान यांच्यात लढत होती. ज्यामध्ये मसूद पेजेश्कियान विजयी झाले आहेत.

निवडणुकीत त्यांनी अनेक दशकांपासून अमेरिकेच्या नेतृत्वाशी संघर्ष करणाऱ्या इराणला पाश्चिमात्य देशांशी जोडण्याचे आश्वासन दिले आहे.
या निवडणुकीत सुधारणावादी नेते पेझेश्कियान यांना १.६३ कोटी मते मिळाली. तर कट्टरवादी उमेदवार सईद जलिली यांना १.३५ कोटी मते मिळाली. पेजेश्कियान यांनी जालिली यांचा २.८ दशलक्ष मतांच्या फरकाने पराभव केला.

पेजेश्कियान हे देशाचे माजी आरोग्य मंत्रीही राहिले आहेत. सुधारणांवर विश्वास ठेवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. पाश्चात्य देशांशी संबंध सुधारण्यावर विश्वास ठेवणारे ते नेते आहेत. इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. यापूर्वी, २८ जून रोजी झालेल्या मतदानाच्या सुरुवातीच्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली नव्हती, त्यामुळे आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत झाली होती.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पश्चिम आशियात प्रचंड तणाव असताना आणि गेल्या अनेक वर्षांपासून इराण आर्थिक संकटाचा सामना करत असताना या निवडणुका झाल्या आहेत. मसूद पेझेश्कियान माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्याकडे झुकले असून, त्यांच्या राजवटीत तेहरानने जागतिक शक्तींसोबत २०१५ चा अणु करार केला. मात्र, हा अणुकरार रद्द झाला आणि कट्टरतावादी नेते पुन्हा सत्तेवर आले होते.

कोण आहेत मसूद पेजेश्कियान?
इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान हे व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि ते इराणच्या तबरीझ वैद्यकीय विद्यापीठाचे प्रमुख आहेत. पेजेश्कियान यांनी १९९७ मध्ये इराणचे आरोग्य मंत्री म्हणून काम केले आहे. मसूद पेझेश्कियान यांनी २०११ सालीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती, परंतु नंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. पेजेश्कियान हे संयमी नेते असून माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या जवळचे मानले जातात. पेझेश्कियान हे कठोर हिजाब कायद्यांचे विरोधक मानले जातात.

भारत-इराण संबंध
भारत आणि इराणमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या मजबूत आर्थिक संबंध आहेत. पेजेश्कियान अध्यक्ष झाल्यानंतर हे संबंध आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे. पेझेश्कियान हे सुधारणावादी नेते आहेत आणि ते पाश्चात्य देशांशी संपर्क वाढवण्याच्या बाजूनेही आहेत. अशा स्थितीत तो भारताशी संबंधांना प्राधान्य देणार नाही, असे होण्याची शक्यता कमी आहे. विशेषतः दोन्ही देशांचे लक्ष सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदरावर असेल. भारताने या प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली असून या बंदरामुळे भारताला पाकिस्तानला मागे टाकून मध्य आशियाशी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. भारताने चाबहार बंदर टर्मिनलच्या विकासासाठी $१२० दशलक्ष देण्याचे वचन दिले आहे आणि इराणमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी $२५० दशलक्ष क्रेडिट लाइन देखील देऊ केली आहे. सत्तेत कोणीही राहिले तरी इराणच्या परराष्ट्र धोरणात बदल होण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.