पंतप्रधान मोदींनी घेतली अमेरिकेच्या इंटेलिजन्स प्रमुख तुलसी गॅबर्ड यांची भेट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 11 h ago
वॉशिंग्टन डीसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या इंटेलिजन्स प्रमुख तुलसी गॅबर्ड यांची भेट.
वॉशिंग्टन डीसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या इंटेलिजन्स प्रमुख तुलसी गॅबर्ड यांची भेट.

 

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांचे वॉशिंग्टन डीसी मध्ये तेथील भारतीय लोकांनी जोरदार स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या इंटेलिजन्स प्रमुख आणि माजी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सदस्य असलेल्या तुलसी गॅबर्ड यांची भेट घेतली.  या बैठकीत त्यांनी भारत-अमेरिका सुरक्षेसंबंधी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. 

याविषयी पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले, “वॉशिंग्टन डीसी मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबर्ड यांची भेट घेतली. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारत-अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा केली, ज्याची ती नेहमीच एक मजबूत समर्थक राहिली आहे.” 

पंतप्रधान मोदी आणि तुलसी गॅबर्ड यांच्यात झालेल्या बैठकीत भारत आणि अमेरिका यांच्यातील समकालीन सुरक्षाविषयक आणि आर्थिक सहयोगावर चर्चा करण्यात आली. भारत आणि अमेरिकेचे संबंध महत्त्वपूर्ण असून दोन्ही देश सामरिक, व्यापारी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांशी सहकार्य करत आहेत.

अमेरिकेच्या इंटेलिजन्स प्रमुख म्हणून तुलसी गॅबर्ड यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्या अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर प्रभावी भूमिका बजावतात. मोदी आणि गॅबर्ड यांच्या चर्चेमध्ये भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि त्यासाठी अधिक प्रभावी जागतिक सहयोगाची आवश्यकता यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. विशेषत: भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, इंटेलिजन्स शेअरिंग आणि जागतिक धोरणाविषयक चर्चांवर अधिक स्पष्टता मिळवण्याची इच्छा व्यक्त केली.

ट्रम्पसोबत पत्रकार परिषद:
मोदी आणि गॅबर्ड यांच्यातील बैठकानंतर, पंतप्रधान मोदी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतील. ट्रम्प यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. भारत-अमेरिका संबंध, जागतिक सुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या धोरणात्मक मुद्यांवर चर्चा होईल. सामरिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी या बैठकीला महत्त्व दिले जात आहे. ट्रम्प आणि मोदी यांच्यातील परिषदा दोन्ही देशांच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणार आहे.

अमेरिका-भारत द्विपक्षीय संबंध  
अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत प्रगतीस लागले आहेत. दोन्ही देशांच्या नेतृत्वाने अनेक महत्त्वाच्या जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर सहकार्य केले आहे. अमेरिकेने भारताच्या सुरक्षा हितासाठी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. भारताने अमेरिकेच्या धोरणात्मक दृष्टीकोनात आपले स्थान मजबूत केले आहे. सुरक्षेच्या बाबतीत भारत आणि अमेरिकेचे सहकार्य अधिक दृढ झाले आहे. तसेच व्यापार, तंत्रज्ञान, आणि इतर क्षेत्रातही दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याचा पाया मजबूत केला आहे.

या बैठकीद्वारे भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य आणखी दृढ होईल. आगामी काळात या दोन देशांच्या परराष्ट्र धोरणात आणखी सामंजस्य आणि समृद्धी दिसून येईल, असे मानले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळे, दोन्ही देशांची धोरणात्मक भागीदारी अधिक मजबुत होईल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter