उझबेकिस्तान आणि यूएईच्या प्रमुखांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
Prime Minister Narendra Modi and UAE President Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan sharing a lighter moment
Prime Minister Narendra Modi and UAE President Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan sharing a lighter moment

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कझान, रशियामध्ये आयोजित १६व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले होते. तेथे त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत अपेक्षित द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झीयोयेव यांच्याशीदेखील महत्त्वपूर्ण चर्चा केली.

उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झीयोयेव यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. त्यामध्ये व्यापार, आरोग्य, तंत्रज्ञान, आणि डिजीटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती यांवर चर्चा झाली.. दोन्ही नेत्यांनी 'ग्लोबल साऊथ'ला बळ देण्याच्या दिशेने एकत्र काम करण्यावर सहमती दर्शवली.

 
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, "कझान येथे उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झीयोयेव यांच्यासोबत खूप चांगली बैठक झाली. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील व्यापार आणि सांस्कृतिक संबंध कसे वृद्धिंगत करता येतील यावर विशेष चर्चा केली."
 
याचवेळी PM मोदींनी युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबत चर्चा केली आणि भारत-युएई व्यापक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला. मोदी म्हणाले, "कझान येथे ब्रिक्स परिषदेसाठी आलेल्या युएईचे राष्ट्राध्यक्ष आणि माझे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतल्याने आनंद झाला."
 
या दोन्ही बैठका चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर लगेचच झाल्या. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारत-चीन संबंध परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि परस्पर संवेदनशीलता या त्रिसूत्रीवर आधारित असावेत अशी भूमिका मांडली.

याआधी ब्रिक्स नेत्यांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावर सर्व सदस्यांचा ठाम पाठिंबा मागितला आणि त्याविषयी 'दुहेरी मापदंड' नकोत, असे आवाहन केले. मंगळवारी मोदींनी कझान येथे पोहोचताच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्यासोबत दोन द्विपक्षीय बैठका घेतल्या होत्या.

बुधवारी संध्याकाळी दिल्लीला परत जाण्याआधी मोदींनी म्हटले, "या शिखर परिषदेने नवीन ब्रिक्स सदस्यांचे स्वागत केल्यामुळे ही परिषद महत्त्वाची ठरली. जगाला अधिक चांगले आणि शाश्वत बनवण्याच्या दृष्टीने या परिषदेने आश्वासक पाउल टाकले आहे."