अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीतून जो बायडन यांची माघार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एक्सवर पोस्ट करत त्यांनी माहिती दिली. ८१ वर्षीय अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांच्या मानसिक आरोग्याचा संदर्भ देत, त्यांच्या उमेदवारीबद्दल रिपब्लिकन कॅम्पमधून प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार, बिडेन यांनी आपला प्रचार थांबवण्याची घोषणा केली.

आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार कोण उभा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांसाठी नवीन उमेदवार शोधणे डेमोक्रॅट कॅम्पसाठी खूप आव्हानात्मक असेल.

बायडन अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती, जेव्हा लाइव्ह डिबेटमध्ये ते ट्रम्प यांच्यापेक्षा मागे पडलेले दिसले.

निवडणुकीपूर्वी, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प व जो बायडन यांच्यात प्रथमच थेट डिबेट आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये ट्रम्प यांचा बायडन यांच्यावर वरचष्मा राहिला होता. अशा स्थितीत बायडन यांनी या शर्यतीतून माघार घ्यावी, चर्चा अमेरिकेच्या राजकारणात सुरू झाली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर अमेरिकन जनतेमध्ये त्यांच्याविषयी सहानुभुती वाढली होती. त्यामुळे यंदा ट्रम्प बाजी मारणार अशी चर्चा सुरू झाली होती.

अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांना पाठिंबा
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, "माझ्या डेमोक्रॅट मित्रांनो, मी यंदा अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा आणि माझ्या उर्वरित कार्यकाळात अध्यक्ष म्हणून माझी सर्व शक्ती माझ्या कर्तव्यांवर केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२० मध्ये पक्षाचे उमेदवार म्हणून माझा पहिला निर्णय कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष म्हणून निवड करण्याचा घेतला आणि आज मी कमला हॅरिस यांना या निवडणुकीत पक्षाच्या पक्षाचे उमेदवार म्हणून पूर्ण समर्थन देऊ इच्छितो. आता ट्रम्प यांना हरवण्याची वेळ आली आहे."