व्हाईट हाऊसमध्ये ‘पोलिटिकली इनकरेक्ट’ डोनाल्ड ट्रम्प

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 14 d ago
Donald Trump-2024 election
Donald Trump-2024 election

 

अमेरिकेच्या २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीतील जनादेश स्पष्ट आणि निर्विवाद आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘स्विंग स्टेट’मधील मतांचा झोका यावेळी ट्रम्प यांच्याकडे गेलेला दिसला. मागच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून पराभव झाल्यानंतर तो ट्रम्प यांना पचवता आला नव्हता. त्यांनी बरीच आदळआपट केली आणि त्यांच्या समर्थकांनी तर ‘कॅपिटॉल हिल’वर हल्ला करून देशाची नाचक्की केली. या सगळ्या घडामोडींनंतर खरे तर ट्रम्प एकाकी पडतील आणि राजकीयदृष्ट्या निष्प्रभ होतील, असे आडाखे मांडले जात होते.

परंतु चिकाटीने ते अध्यक्ष बायडेन यांना आक्रमक विरोध करीत राहिले. एक शक्तिमान राजकीय पर्याय आपणच आहोत, म्हणून जनतेसमोर येत राहिले. त्यांच्यावर झालेल्या हिंसक हल्ल्याचे पुरेपूर भांडवल करण्यातही यशस्वी झाले आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेपुढच्या आर्थिक समस्यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारची धोरणे जबाबदार आहेत, हे ‘कथन’ लोकांच्या मनावर बिबवण्याचा प्रयत्न करीत राहिले. या व्यूहरचनेला यश आले आहे. या निमित्ताने जगभरच लोकशाहीप्रणालीच्या सद्यःस्थितीविषयी काही भाष्य करणे अप्रस्तुत ठरणार नाही. निवडणुका हा दिवसेंदिवस प्रतिमानिर्मितीचा, कथनकौशल्याचा, पैशांचा खेळ होत चालला आहे.

भावनांना हात घालणे, प्रतिस्पर्ध्याला विरोधक म्हणून नव्हे तर शत्रू मानून त्याच्यावर तुटून पडणे हे प्रकार फोफावले आहेत आणि जागतिक महासत्ताही त्याला अपवाद नाही, हे या निवडणुकीने प्रकर्षाने पुढे आणलेले वास्तव काळजी वाटावी, असे आहे. खरे तर तेथील निवडणूक हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. जगाने त्यात दखल घेण्याचे कारणच काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. परंतु या देशाची आर्थिक-सामरिक ताकद, भूराजकीय महत्त्व आणि या देशाच्या परराष्ट्र धोरणाचे जगावर होणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम यामुळे तेथे कोण सत्तेवर येणार, याविषयी उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे.