भारत- चीन सीमेवर शांततेला प्राधान्य द्यावे - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट

 

भारत आणि चीनदरम्यान सीमावादाबाबत दोनच दिवसांपूर्वी ऐतिहासिक समझोता झाला असताना काल (ता. २४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्यांवर तब्बल ५० मिनिटे चर्चा केली.

‘ब्रिक्स’ संमेलनाच्या निमित्ताने पाच वर्षांनंतर हे दोन नेते प्रथमच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. दोन्ही देश परस्परांप्रती आदराची भावना आणि रणनितीक प्रगल्भता दाखवीत शांततापूर्ण आणि स्थिर संबंध प्रस्थापित करू शकतात असा आशावाद व्यक्त करण्यात आला. पूर्व लडाखमधील सीमावादावरून दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचेही उभय नेत्यांकडून स्वागत करण्यात आले. सीमावादाचा दोन्ही देशांदरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरील शांतता आणि स्थैर्यावर परिणाम होता कामा नये अशी अपेक्षा पंतप्रधानांकडून व्यक्त करण्यात आली.

दोन्ही देशांदरम्यान तणावाचा मुद्दा बनलेल्या सीमावादावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या विशेष प्रतिनिधींचे महत्त्व देखील यावेळी अधोरेखित करण्यात आले. या विशेष प्रतिनिधींनी लवकर भेट घेऊन आपल्या प्रयत्नांना गती द्यावी अशी सूचना पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्याकडून करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले.

या विशेष प्रतिनिधींची पुढील भेट योग्य वेळी होईल अशी आशाही दोन्ही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेत त्याच्या दीर्घकालीन परिणामांबाबत देखील चर्चा केली. द्विपक्षीय संबंधांचा प्रादेशिक स्थैर्य आणि शांततेवर देखील परिणाम होईल असे त्यांनी मान्य केल्याचे मिस्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "भारत आणि चीन परराष्ट्र संबंधांतील स्थैर्य जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे. सीमावादावर चार वर्षांनंतर आता जो तोडगा निघाला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. आपण शांतता आणि स्थैर्याला प्राधान्य द्यायला हवे. परस्परांप्रतीचा विश्वास, आदर आणि संवेदनशीलता हा या संबंधांचा पाया असावा."

तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे की, "दोन्ही देशांनी आपआपसांतील मतभेदांवर योग्य पद्धतीने तोडगा काढायला हवा. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी संवाद आणि आपआपसांतील सहकार्य देखील मजबूत करायला हवे. स्थिर संबंधांसाठी भारत-चीनने एकत्रित काम करायला हवे त्यामुळे दोन्ही देशांना विकासाचे लक्ष्य गाठता येणे शक्य होईल."